मुंबई पुन्हा तुंबली..!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली तर, गोरेगाव ते वांद्रेदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जोरदार पावसामुळे ट्रॅफिक जाम आहे, त्यामुळे वाहनचालकांची कसरत होत आहे.

मुंबई : मुंबईला पावसाने गेल्या तीन दिवसांपासून झोडपून काढले आहे, पावासाचा जोर अजूनही कायम आहे. दादर ते सायन पर्यंतचा मार्ग पाण्याखाली गेला आहे, मात्र मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा पंधरा ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. सायन कुर्ला दरम्यान रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे उशिराने सुरू आहे, त्यामुळे  प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. यामुळे मेट्रो मध्ये मोठया संख्येने गर्दी झाली आहे.

पश्चिम रेल्वे 20 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. बोरीवली ते विरार लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधे प्रवासी अडकून पडले आहेत. 

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली तर, गोरेगाव ते वांद्रेदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जोरदार पावसामुळे ट्रॅफिक जाम आहे, त्यामुळे वाहनचालकांची कसरत होत आहे.

संततधार पावसाने हिंदमाता, परळ, दादर टीटी, माटुंगा, सायन, अँटॉप हिल, चेम्बूर, एल्फिंस्टन, कुर्ला, गोरेगाव, मिलन सबवे, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, आदी ठिकाणी पाणी भरलं आहे. पाणी भरलेल्या भागातील बेस्ट वाहतूक दूसऱ्या मार्गाने वळविली आहे. भरलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी 111 पंप सुरु आहेत. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज शाळांना सुट्टी नसल्याचे जाहिर केल आहे.

ठाणे जिल्ह्यात आज अतिवृष्टीच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना आज (मंगळवार) सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे मा.शिक्षणाधिकारी (प्राथ.) संगीता भागवत यांनी कळवले आहे.

दहिसर पूर्व एन.जी.पार्क परिसरात काल रात्री 3 घरं कोसळली आहेत. येथील बाळू मामा मंदिराजवळील घरावर संरक्षक भिंत पडल्याने घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येथील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पूर्वेकडील केतकी पाडा, खान कंपाऊंड, हनुमान टेकडी आदी डोंगराळ भागात पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता असते. अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे. दुर्घटनेच्या वेळी सुदैवाने घरात कुणी नसल्याने जीवितहानी टळली.

गेल्या 12 तासात कुलाबा इथ 145.8 मिलीमीटर तर सांताक्रूझ येथे 137.1 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सखल भागात पाणी भरल्याने रस्ते वाहतूकिला त्याचा फटका बसला आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

डबेवाले संघटनेने आज मुंबईत डबे पोहचवण्याचा व्यवसाय बंद ठेवला आहे.
डबेवाल्यांना सकाळी 7 वाजताच घरातून डबे न घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
- सुभाष तळेकर, प्रवक्ते, मुंबई डबेवाला असोशिएशन

Web Title: heavy rain in mumbai tumbled road local block