शेकाप वर्धापन दिनी पावसाचाच‘आवाज’

रोहा : शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा करण्यात आला. यासाठी कार्यकर्त्यांची झालेली अलोट गर्दी.
रोहा : शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा करण्यात आला. यासाठी कार्यकर्त्यांची झालेली अलोट गर्दी.

रोहा : शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणाऱ्या शेकापचा आज वर्धापन दिन. दुपारपासूनच सोहळ्याच्या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आणि वाजत गाजत येत होते. परंतु, त्यांच्या उत्साहावर जोरदार पावसाचे पाणी पडले. त्यामुळे सोहळा रंगात आला असतानाच अनेक कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला. 
 
रोहा शहरात मेहंदळे हायस्कूलच्या मैदानात शेकापचा ७२ वा वर्धापनदिन सोहळा आयोजित केला होता. त्यासाठी ४० हजार चौरस फुटांचा मंडपही कमी पडत होता. कार्यकर्त्यांचा हा उत्साह पाहिल्यानंतर नेत्यांमध्येही जोश संचारला होता. मात्र, दुपारी ४ वाजता मुसळधार पाऊस पडू लागला. पाण्याचे पाट मंडपातून वाहू लागले होते. मंडपातील खुर्च्या सुमारे फूटभर पाण्यात बुडाल्या होत्या. अनेक कार्यकर्ते या वेळी उठून जाऊ लागले. त्यामुळे अर्धे सभामंडप रिकामे झाले. थांबलेल्या कार्यकर्त्यांपैकी काहींनी रिकाम्या खुर्चीवर पाय ठेवणे पसंत केले.

तरुणाईला सेल्फीचा मोह 
शिस्तीबाबत शेकापचे कार्यकर्ते परिचित आहेत. मात्र, नव्या तरुण कार्यकर्त्यांना प्रत्येक प्रसंगी सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. अनेक कार्यकर्ते खटारा व स्टेजसमोरही सेल्फी काढण्यात मग्न होते. तरुण व महिलांची संख्या अधिक असल्याचे दिसत होते.

लाल बावटा फडकला
वर्धापन दिनाच्या निमित्ताने रोह्यात ठिकठिकाणी स्वागतफलक आणि कमानी शोभून दिसत होत्या. लाल बावट्याने शहर लालेलाल झाले होते. कार्यकर्ते मोठ्या संख्येने पालिका शॉपिंग कॉम्प्लेक्‍सच्या पार्किंगवर जमा झाले होते. मात्र, पाऊस अधेमधे जोरदार हजेरी लावून त्यांना भिजवत होता. दुपारी २ वाजता आमदार जयंत पाटील, पंडित पाटील, आमदार धैर्यशील पाटील, भावना पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, आस्वाद पाटील, विवेक पाटील आदी नेते मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी पोहोचले. मिरवणुकीत लेझीम व ढोलताशा पाथकासहित हजारो कार्यकर्ते सामील झाले होते. मिरवणूक जैन मंदिरमार्गे कार्यक्रमस्थळी दुपारी साडेतीन वाजता पोहोचली. दरम्यान, पावसाचा जोर आणखी वाढला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com