Mumbai Rains : पावसाचे 'ठाणे'; तलावांचे शहर बनले 'तळे'  

दीपक शेलार
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

ठाण्यात 15 वृक्ष उन्मळून पडले असून तब्बल 35 ते 40 ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या. तर, रेल्वे मार्गातही पाणी तुंबल्याने लोकलसेवा मंदावून विस्कळीत झाली.

ठाणे : ठाण्यात शुक्रवारी सायंकाळीपासून सुरु झालेल्या झालेल्या मुसळधार जलधारांमुळे पावसाचे 'ठाणे' बनल्याची अनुभूती मिळाली. तलावांचे शहर अशी ख्याती असलेल्या ठाणे शहरात शनिवारी कोसळलेल्या पावसामुळे रस्ते जलमय होऊन जागोजाग तळे साचले होते. येऊरसारख्या ठिकाणी ओढ्यांना पूर आल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत होते.

ठाण्यात 15 वृक्ष उन्मळून पडले असून तब्बल 35 ते 40 ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या. तर, रेल्वे मार्गातही पाणी तुंबल्याने लोकलसेवा मंदावून विस्कळीत झाली. दरम्यान, दिवसभरात ठाण्यावर मोठी आपत्ती ओढवली नसली तरी, दोन दुर्घटनांमध्ये दोन युवकांचा मृत्यू ओढावला असून दोघेजण जखमी झाले. शनिवारी सकाळी अवघ्या दोन तासातच 100 मिमी पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दिवसभरात 212 मिमी पावसाची नोंद झाली, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्कालीन कक्षाकडून देण्यात आली. तर, वेधशाळेने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आपत्कालीन व्यवस्था, एनडीआरएफ आणि टिडीआरएफला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.  

सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने ठाण्याला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे ठाण्यातील अनेक भागात पाणी तुंबले. शहरातील नौपाडा, भास्कर कॉलनी, वृंदावन सोसायटी, राबोडी, श्रीरंग सोसायटी, कोपरी परिसर आणि हाजूरी भागातील काही घरात पाणी शिरले. शहरातील 35 ते 40 ठिकाणी पाणी साचून तळे साचले होते.तर,घोडबंदर रोडवर ठिकठिकाणी व हिरानंदानी इस्टेट या उच्चभ्रू संकुलातील रस्त्यांवर पाणी साचल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

हिरानंदानी संकुलातील शॉपिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. दुपारनंतर थोडी उसंत घेत पुन्हा दमदार बरसणाऱ्या पावसाने हाहाकार माजवला. ठाणे महापालिकेची भिवंडी, दिवा-अंजूर ते माणकोली या टीएमटी बसमध्ये रस्त्यावरील पाणी शिरल्याने प्रवाशांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे सकाळपासूनच ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे लोकलचा वेग मंदावून वेळापत्रक कोलमडले. सकाळच्या सत्रात कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याने दक्षता म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे शहर व जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना संतती जाहीर केली. तसेच, सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळांनी विद्यार्थ्यांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन करण्याचे निर्देश देण्यात आले. दुपारी भरतीची वेळ असल्याने प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान,दिवसभरात मोठी आपत्ती ओढवली नसली तरी,तीन दुर्घटनामध्ये दोघांचा मृत्यू आणि एकजण गंभीर जखमी झाला आहे.चितळसर,मानपाडा येथे सकाळी भरधाव ट्रकची धडक बसून वृत्तपत्र वितरण करण्यासाठी निघालेल्या नवीन शुक्ला या 17 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर,त्याचा दुचाकीचालक सहकारी नागेश्वर सिंग हा जखमी झाला.

ठाणे मनोरुग्णालयाजवळील धर्मवीर नगरमध्ये घरात शिरलेल्या पाण्यात रेफ्रिजरेटरला शॉक लागून संतोष गोळे (वय 18) याचा मृत्यू ओढवला.घोडबंदर रोडवरील वसंतलीला गृहसंकुलात पाण्याच्या दाबामुळे संरक्षक भिंत कोसळून कार क्षतिग्रस्त झाली.लोकमान्य नगर टीएमटी डेपोमध्ये हॅन्डब्रेक न लावता उभी केलेली टीएमटी बस थेट संरक्षक भिंतीला धडकून रिक्षावर आदळली.तर,मुंब्रा,आनंद कोळीवाडा येथे एका बेकरीची चिमणी कोसळून कामगार गंभीर जखमी झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in Thane from yesterday