esakal | मध्य रेल्वेला मुसळधार पावसाचा फटका, 24 मेल-एक्स्प्रेस रद्द!
sakal

बोलून बातमी शोधा

railway

मध्य रेल्वेला मुसळधार पावसाचा फटका, 24 मेल-एक्स्प्रेस रद्द!

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) कर्जत-लोणावळा (Karjat Lonavala) घाट भागात जोरदार पावसामुळे रेल्वे वाहतूक (Railway Stopped) ठप्प झाली. कसारा घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या (Land Slide) घटना घडल्या. तर, काही ठिकाणी रेल्वे रूळ वाहून गेले आहे. त्यामुळे बुधवारी, (ता.21) रोजी पडणाऱ्या पावसामुळे घाट विभागातील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे 24 लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्या रद्द(Express Train) करण्यात आलेली आहे. तर, 22 मेल-एक्सप्रेस गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेल्या आहे. ( Heavy Rainfall Impact on Central Railway Express Trains Cancelled - nss91)

बुधवार- गुरुवारच्या मध्यरात्रीपासून मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. रस्ते महामार्गासोबत रेल्वे मार्गालाही याचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेने खबरदारी म्हणून टिटवाळा ते इगतपुरी स्थानकांदरम्याची रेल्वे वाहतूक बंद केली आहे. यामुळे नाशिककडे जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक मेल-एक्सप्रेस रेल्वे गाड्या अडकल्या होत्या. अमरावती एक्सप्रेस इगतपुरीजवळ अडकलेली होती. मात्र, प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता 22 रेल्वे गाड्या शॉर्टटर्मिनेट करण्यात आलेल्या आहे. तर, गुरुवारी, (ता.22) रोजी येणाऱ्या आणि जाणाऱ्या  24 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या.

हेही वाचा: प्रवाशांच्या संकटकाळात 'लालपरी' धावली, पहाटे चार वाजता 'ST' चे मदतकार्य

मुसळधार पावसामुळे कसारा घाटातील रेल्वे रुळांवर पाणी साचण्याबरोबरच दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. यात रुळांखालील खडी वाहून गेली. तर, सिग्नल यंत्रणेची मोठी हानी झाली. या रेल्वे मार्गावरील दरड उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच रेल्वेचे अभियांत्रिकी पथक सुद्धा रेल्वेचे ओवरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्याचे काम सुद्धा करण्यात येत आहे. याशिवाय घाट विभागातील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वेचे अभियांत्रिकी पथक आणि कर्मचारी घाट विभागात तैनात करण्यात आले आहे.मुसळधार पावसामुळे जुन्या कसारा घाटातही  दरड कोसळली.

त्यामुळे मुंबई- नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. खर्डी ते इगतपुरी स्थानकांदरम्यान मुंबईतून निघालेली अमरावती एक्सप्रेस अडकली होती. उंबरमाळी येथे रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी भरल्याने अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत होती. तसेच कसारा घाटात रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या. घाट विभागातील परिस्थितीवर मध्य रेल्वे प्रशासनाचे लक्ष ठेवून उपाययोजनेचे कामे हाती घेतली होती. तसेच रेल्वेचे अभियांत्रिकी पथक आणि कर्मचारी घाट विभागात तैनात केले होते.

loading image