ठाणे शहरात तब्बल 169 मिलीमीटर पावसाची नोंद, यंदा आतापर्यंत 3 हजार 56 मिमी पाऊस

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

बुधवारी सकाळी 8.30 पर्यंत 169.18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे शहरात यंदा आतापर्यंत 3 हजार 56 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

ठाणे, ता. 23 : ठाणे शहरात काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मंगळवारी रात्रीपासून त्यामध्ये अचानक बदल झाला असून जोरदार पावसामुळे 24 तासांत तब्बल 169.18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर शहरातील सहा ठिकाणी पाणी साचले होते. मुंब्य्रात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. 

काही दिवसापासून शहरात दुपार आणि संध्याकाळच्या वेळी तुरळक स्वरूपात पडणा-या पावसाने मंगळवारी रात्रीपासून पुन्हा दमदार हजेरी लावली. रात्री 11.30 ते 12.30 या एका तासाच्या वेळेत 45.47 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर 1 ते 2.30 वाजेर्पयत पुन्हा 41.15  पाऊस पडला. त्यानंतर 3.30 नंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे दिसून आले.

महत्त्वाची बातमी : तारीख होती २३ सप्टेंबर १९८१; तब्बल ३९ वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला झालेला धुवाधार तुफानी पाऊस

बुधवारी सकाळी 8.30 पर्यंत 169.18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे शहरात यंदा आतापर्यंत 3 हजार 56 मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 4 हजार 319 मिलीमीटर पाऊस झाला होता. 

पावसामुळे कळवा रेल्वे स्थानकाजवळील सत्यम शिवम सुदंरम इमारतीच्या परिसरात पाणी साचले होते. तर, चिखलवाडी, नौपाडा, राजहंस सोसायटी कळवा, जगदाळे वाडी कोपरी, सिध्दार्थ नगर कोपरी, गणपती मंदिर कोळीवाडा आदी भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. येथील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. मुंब्य्रात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. यामध्ये  कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती कक्षाच्या वतीने देण्यात आली.

( संपादन  - सुमित बागुल )

heavy rainfall in mumbai and thane city registered 169 mm rainfall


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rainfall in mumbai and thane city registered 169 mm rainfall