अतिवृष्टीचा एसटीलाही फटका; कोकणात जाणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द....

प्रशांत काबंळे
Wednesday, 5 August 2020

मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे-माणगाव आदी ठिकाणी पुराचे पाणी आल्याने  वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांसाठी एसटीने जय्यत तयारी केली होती. त्यानुसार मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन विभागातून 23 बसेस आज सोडण्यात येणार होत्या. परंतु मुंबईसह कोकणात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचल्याने तसेच ठिकठिकाणी वाहतूक बंद असल्याने त्याचा फटका एसटी वाहतुकीला बसला.

मुंबईची लाईफलाईन पुन्हा ठप्प; तीनही रेल्वेमार्गावर पाणी भरले...

अतिवृष्टीमुळे एसटीच्या बसेसना प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. तरीही मुंबई विभागातून दोन आणि ठाणे विभागातून दोन अशा एकूण चार बसगाड्या मार्गस्थ करण्याचे नियोजन होते. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे-माणगाव आदी ठिकाणी पुराचे पाणी आल्याने  वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

 

नवी मुंबई आयुक्तांचा कामाचा धडाका, कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु

मंगळवारी रात्रीपासूनच व्यक्तिगत आगाऊ आरक्षणाला सुरूवात करण्यात आली आहे. गट आरक्षणासाठी (ग्रुप बुकिंग) संबंधित प्रतिनिधींनी जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे. गुरूवारी पावसाचा अंदाज घेऊन कोकणासाठी जाणारी पुढील वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी सांगितले आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rains in mumbai and suburbans affects on st transport going towords konkan