मुंबईची लाईफलाईन पुन्हा ठप्प; तीनही रेल्वेमार्गावर पाणी भरले...

प्रशांत कांबळे
Wednesday, 5 August 2020

रेल्वे रुळांवर पाणी भरल्याने सीएसएमटी आणि चर्चगेट रेल्वे स्थानकांवरून सुटणाऱ्या लोकल बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल होताना दिसून येत आहे. 

मुंबई : मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मुंबईतील लोकलसेवा विस्कळित झाली होते. दुपारी पाणी ओसरल्यानंतर लोकलसेवा पुन्हा सुरु झाली होती. त्यानंतर  दुसऱ्या दिवशी आजही दुपारनंतर मुंबईत पुन्हा दमदार पावसाने बॅटिंग करण्यास सुरुवात झाली. दमदार पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्ग दुपारनंतर ठप्प झाले आहे.  रेल्वे रुळांवर पाणी भरल्याने सीएसएमटी आणि चर्चगेट रेल्वे स्थानकांवरून सुटणाऱ्या लोकल बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल होताना दिसून येत आहे. 

नवी मुंबई आयुक्तांचा कामाचा धडाका, कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु

मध्य रेल्वेच्या हार्बर रेल्वे मार्गावरील मस्जिद बंदर, सॅन्डहर्ट्स रोड रेल्वे रूळांवर पाणी भरल्याने सुरुवातीला सीएसएमटी ते वडाळा रेल्वे सेवा बंद दुपारी 3.35 वाजता बंद करण्यात आली. त्यानंतर 4.10 मिनीटाने हार्बर रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते वाशीपर्यंतची सेवा बंद करण्यात आली आहे. तर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कुर्ला हा मार्ग सुद्धा 4.10 मिनीटाने बंद करण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. 

सामनाच्या फ्रंट पेजवरील सूचक जाहिरात म्हणतेय, "हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे !"

पालघरमध्येही सकाळच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिसरात सुमारे 266 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते डहाणू रोड दरम्यान धीम्या गतीने लोकल सेवा सुरू होती. मात्र दुपारी 3 नंतर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे सेवा बंद करण्यात आली असून त्यापुढील सेवा मात्र धीम्या गतीने सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.

महाड शहरात पूरस्थिती; सावित्री नदीच्या पुराचं पाणी शहरात, नागरिकांमध्ये घबराट

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अडकले स्थानकांवर
सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून मुख्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा 4 वाजताच्या दरम्यान बंद करण्यात आली आहे. हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते वाशी आणि कुर्ला पर्यंत लोकलसेवा बंद केली आहे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दुपारी 3 नंतर चर्चगेट ते  मुंबई सेंट्रल पर्यंतची सेवा बंद असल्याने कामावरून परत जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी रेल्वे स्थानकांवर अडकून पडले आहे. अशा परिस्थितीत इतर कोणत्याही सार्वजनिक प्रवासी सुविधा उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: local trains shuts in mumbai amid water logging on all three routes