
तुर्भे : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. त्यात धान्य बाजार, मसाला बाजाराबरोबर कांदा-बटाटा बाजारात रस्त्यांची चाळण झाली आहे. या उखडलेल्या, खड्ड्यांच्या रस्त्यातून मार्ग काढताना अवजड वाहनांच्या चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, मसाला आणि अन्नधान्य बाजाराच्या रस्त्यांच्या डांबरीकरणावर या वेळी २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तरीही रस्ते खड्ड्यात गेले असून बाजारात पावसाचे पाणी तुंबण्याचे प्रकार होत आहेत. याबाबत बाजार घटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.