esakal | घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलावर अवजड वाहनांना प्रवेशाची प्रतीक्षा.
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलावर अवजड वाहनांना प्रवेशाची प्रतीक्षा.

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मानखुर्द : घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलावरील उच्च दाबाच्या विद्युतवाहीनींची उंची वाढवण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.त्यासाठी आवश्यक जागेसाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडे विचारणा केली आहे.या विद्युत वाहीन्यांमुळे पुलावरून अवजड वहानांना प्रवेशबंदी केलेली आहे.दोन्ही दिशेला बॅरिकेड लावून अवजड वाहनांची वाट अडवण्यात आली आहे.

घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपूल बांधकाम सुरू झाल्यापासून विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. नामकरण वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या पुलाचे मागील महिन्यात नामकरण न करताच अखेर लोकार्पण झाले.त्यानंतर इंडियन ऑईल नगर ते मानखुर्द टी जंक्शन हा प्रवास वाहतूक कोंडी शिवाय वेळेची बचत करणारा होईल ही अपेक्षा होती.परंतु वेळेच्या बचतीचा अधिक मोह झाल्यामुळे ताशी पन्नास किलोमीटर वेगमर्यादा असताना देखील भरदाव वेगात वाहने जात होती.ही बचत किंवा शर्यत जीवघेणी ठरू लागली होती.

वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात वाढू लागले.त्या अपघातांमध्ये आतापर्यंत दोघांचा बळी गेला तर कित्येकांना गंभीर इजा झाली.आता हा पुल वाहतुकीसाठी पुन्हा बंद करून त्यावर अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची पुर्तता पालिकेकडून केली जात आहे. मोहिते पाटील नगर येथे या पुलाच्या जवळून उच्च दाबाच्या विद्युतवाहीन्या आहेत.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन अवजड वहानांना या पुलावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

हेही वाचा: Mumbai Pune Expressway मार्गावर सर्रास नियमांना हरताळ; अवजड वाहनांचे जागोजागी थांबे

अवजड वाहने पुलाखालून ये जा करतात परिणामी मानखुर्द वाहतूक विभागातील कर्मचारी वाहतूक कोंडी होऊ नये याची दक्षता घेत असतानादेखील मोहिते पाटील नगर,डम्पिंग,बैंगणवाडी तसेच शिवाजी नगर जंक्शन येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असते.अवजड वाहनांना देखील पुलावर प्रवेश मिळावा म्हणून या उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्यांची उंची वाढविण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.ही उंची वाढवण्यासाठी जागेची आवश्यकता आहे.

त्या जागेचा ताबा मिळावा म्हणून पालिका महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडे पाठपुरावा करत आहे.त्या जागेचा ताबा मिळाल्यानंतर महावितरण कडून या विद्युतवाहिन्या अधिक उंचीवर नेण्यात येतील.त्यानंतर या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना प्रवेश मिळणार आहे.ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अवजड वाहनांना उड्डाणपुलावर प्रवेशासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे

loading image
go to top