मुंबईच्या डबेवाल्यांचा पुढाकार; पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

'एकमेंका साहाय्य करु, अवघे धरु सुपंथ' ही साधू संताची शिकवण अंमलात आणण्याची हीच खरी वेळ आली आहे.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागातील शेकडो गावांना पुराचा तडाखा बसला आहे. अशा पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या मंगळवारी (ता.13) मुंबईच्या विविध भागात मदत फेरी काढून मदत गोळा करणार आहेत. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुंबईकरांनी पुढे यावे आणि जमेल तशी मदत करावी, असे आवाहन मुंबई डबेवाला जेवण वाहतूक मंडळाकडून करण्यात आले आहे.      

'एकमेंका साहाय्य करु, अवघे धरु सुपंथ' ही साधू संताची शिकवण अंमलात आणण्याची हीच खरी वेळ आली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील पूरग्रस्तांना मदत करणे हे मुंबईकरांनी परम कर्तव्य माणून पुढे आले पाहिजे. पुराच्या पाण्यात हजारो संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशा लोकांना एक हात मदतीचा पुढे करत मुंबईकरांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन मुंबई डवेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी केले आहे.

आम्ही आमच्या दोन लाख ग्राहकांपर्यंत पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी आवाज दिला असून त्यांच्याकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी (ता.17) डबेवाल्यांचे एक पथक जमा झालेले साहित्य घेऊन पूरग्रस्त नागरिकांना आधार देण्यासाठी जाणार असल्याचेही मुके यांनी सांगितले.

इथे मदत देऊ शकता
ज्या कुणाला पूरग्रस्तांना मदत करायची आहे, अशा व्यक्तींनी 16 ऑगस्ट संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मुंबई डबेवाल्यांच्या नवप्रभात चेंबर्स, 3 मजला, रानडे रोड, दादर पश्‍चिम येथील कार्यालयात स्री व पुरूष यांच्यासाठी कपडे, लहान मुलांचे कपडे, ब्लँकेट, धान्य (तांदूळ,डाळ, तेल, साखर, गव्हाचे आणि ज्वारीचे पिठ), सुका खाऊ पॅकिंग, बिस्किटस, चिवडा, फरसाण अशा स्वरुपात मदत आणून द्यावी.

डबेवाले काढणार मदतफेरी
मुंबई डबेवाले मुंबईच्या दादर, अंधेरी, वांद्रे आणि चर्चगेट भागात
सकाळी 11 ते दुपारी 1 या काळात पूरग्रस्तांसाठी मदतफेरीही काढणार आहेत. जमा झालेली मदत शनिवारी (ता. 17) पूरग्रस्तांना पोहोच करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help the flood victims of Sangli and Kolhapur Mumbai Dabbewala Appeals