मुंबईत हाय अलर्ट; रेल्वेने दिला सतर्कतेचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

  • मुंबई रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला आहे.
  • रेल्वे मंडळाचे अध्यक्ष यादव यांच्या सूचना
  • प्रवाशांनाही आवाहन

मुंबई : मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला आहे. येत्या तीन महिन्यांत मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिल्याने रेल्वेने अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे. 

'सुरक्षा व्यवस्थेत वाढ करा, संशायस्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, रेल्वे स्थानकांवर विशेष करून लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये शोध मोहीम हाती घेण्याच्या' सूचना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. विशेषत: दिल्लीकडून येणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमध्ये बॉम्बशोधक पथकाद्वारे आणि श्वान पथकाद्वारे तपासणी करण्याचे आदेश आहेत. 

गुप्तचर संघटनेचा रिपोर्ट -
येत्या तीन महिन्यात मुंबई रेल्वे स्थानकांवर हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे तीन महिन्यांसाठी मुंबईतील रेल्वे स्थानकांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गर्दीच्या स्थानकांत गर्दी विभाजनासाठी सुरक्षा यंत्रणांची मदत घेण्याचा आदेशही रेल्वे सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली आहे.

रेल्वे मंडळाचे अध्यक्ष यादव यांच्या सूचना - 
रेल्वे मंडळाचे अध्यक्ष यादव यांनी रेल्वे पोलिस महासंचालक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या महासंचालक यांना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुंबई रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा अधिक कडक करण्याच्या सूचना केल्या आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ला आणि कानपूर-भिवानी कालिंदी एक्स्प्रेस शौचालयातील दुर्घटना या दोन्ही हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या होत्या.

प्रवाशांनाही आवाहन -
दैनंदिन कामकाजात मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांची बॅग स्कॅनरद्वारे बॅग तपासणी, विशिष्ट वेळेनंतर रेल्वे स्थानकाची श्वान पथकाकडून पाहणी होत आहे. बेवारस वस्तू अथवा संशयित बॅग दिसल्यास त्याची माहिती तातडीने आरपीएफ अथवा जीआरपी कर्मचाऱ्यांना द्यावी, प्रवाशांनी अफवा पसरवू नयेत तसेच पोलिसांच्या तपासणीला सहकार्य करणे आवश्यक असल्याची माहिती रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. 

आपटा गावातील एसटी बस मध्ये आईडी बॉम्ब सापडल्यानंतर मुंबईतील लोकलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आले आहे. लोकल रेल्वे, मेट्रो, मोनो सह, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हायअलर्ट असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क आहेत. दररोज लाखो मुंबईकर लोकल ट्रेनने प्रवास करतात. हल्ल्याची सूचना मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली. तसेच संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास त्यांना त्याब्यात घेऊन चौकशी करण्याचा आदेश देण्यात आले आहे. यामध्ये आरपीएफ, जीआरपी, महाराष्ट्र पोलीस, बॉम्ब स्कॉड पथक, डॉग स्कॉट पथक, रेल्वे मार्गांवर तैनात करण्यात आले आहे.
- के के अषरफ, मध्य रेल्वे विभागीय सुरक्षा आयुक्त यांनी सांगितले. 

एसटी महामंडळाने सुरक्षेसंदर्भात परिपत्रक -
एसटी महामंडळात वाहक अनेकवेळा अनधिकृत कुरियर वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामधून देशविघातक कारवाई होण्याची शक्यता असल्याने, एसटी महामंडळाने सुद्धा आपटा गावात आईडी बॉम्ब आढळल्यानंतर राज्यातील एसटी आगारांना परिपत्रक काढून सुरक्षेच्या दृष्टीने आदेश दिले आहे.

 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Web Title: high alert in mumbai railway stations because the possibility of a terrorist attack