सांडपाण्यावर प्रक्रिया हवीच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

शहर-उपनगरांमधील सांडपाणी योग्य प्रक्रिया करूनच अरबी समुद्रात सोडण्याची यंत्रणा मुंबई महापालिकेने काटेकोरपणे राबवलीच पाहिजे, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ११) दिला.

मुंबई - शहर-उपनगरांमधील सांडपाणी योग्य प्रक्रिया करूनच अरबी समुद्रात सोडण्याची यंत्रणा मुंबई महापालिकेने काटेकोरपणे राबवलीच पाहिजे, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ११) दिला. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पाहणी करून महापालिकेकडून तिमाही अहवाल घ्यावा, असे निर्देशही खंडपीठाने दिले. 

शहरातील कचरा, सांडपाणी प्रक्रिया न करताच मिठी नदीत जाते; ते त्याच स्वरूपात अरबी समुद्रात पोहोचते. त्यामुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे एमपीसीबीने न्यायालयात सांगितले. महापालिकेच्या मलजल प्रक्रिया केंद्रांची क्षमता २५९५ दशलक्ष लिटर असली, तरी सध्या २०१६ दशलक्ष लिटर सांडपाण्यावरच प्रक्रिया होते, असे मंडळाच्या वकील शर्मिला देशमुख यांनी निदर्शनाला आणून दिले. त्याला महापालिकेनेही दुजोरा दिला. 

महापालिकेने या समस्येची दखल घेतली असून, नवीन सांडपाणी वाहिनी सुरू करण्याच्या प्रक्रिया सुरू आहेत, असे ज्येष्ठ विधीज्ञ अनिल साखरे यांनी सांगितले. शहरात सुमारे २०१२ किलोमीटरच्या मलजलवाहिन्या टाकल्या जाणार असून, आठ प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. सर्व वाहिन्यांमधील सांडपाणी प्रक्रिया केल्यानंतरच समुद्रात सोडले जाईल, याची दक्षता महापालिकेने घ्यावी. नवीन मलजलवाहिन्या टाकण्याची कालमर्यादा ठरवून, त्याचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही खंडपीठाने दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High Court ordered the process on the sewage treatment process