...तर लोक तुम्हाला आणखी बदडतील - उच्च न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

मुंबई - 'तुम्ही डॉक्‍टर अशा प्रकारे प्रकरण ताणत ठेवत असाल तर होणाऱ्या त्रासाने कंटाळलेले लोक तुम्हाला आणखी बदडून काढतील. तसे वातावरण तुम्हीच निर्माण करत आहात. त्यामुळे शनिवारी (ता. 25) सकाळी 8 वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा; अन्यथा कारवाईला सामोरे जा,'' असा सज्जड दम उच्च न्यायालयाने आज संपकरी निवासी डॉक्‍टरांना दिला. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएएम) आणि मार्ड या डॉक्‍टरांच्या संघटनांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले.

संपकरी निवासी डॉक्‍टर कामावर येत नसल्यास त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. त्यानंतरही डॉक्‍टर कामावर रुजू झाले नाहीत. संपकाळात राज्यात 77 रुग्णांना प्राण गमवावे लागत असल्याची बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिली. मुंबईत पालिकेच्या रुग्णालयांत 135 रुग्णांना (लोकमान्य टिळक रुग्णालय (48), नायर (34) आणि केईएम रुग्णालयात (53) प्राण गमवावे लागल्याचे वकील सुरेश पाकळे यांनी सांगितले. त्यावर डॉक्‍टरांनी आडमुठी भूमिका न सोडल्यास आम्ही त्यांचे रक्षण करू शकणार नाही, असे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुला चेल्लूर आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने ठणकावून सांगितले.

'डॉक्‍टरांचा हेकेखोरपणा असाच कायम राहणार असेल, तर त्यांच्याबाबतचे निर्देश आम्हाला बदलावे लागतील. "मार्ड'चे प्रतिनिधी या नात्याने न्यायालयात हमी देऊनही तुमच्या संघटनेचे सदस्य कामावर रुजू होत नसतील, तर ते चुकीचे आहे,'' अशा शब्दांत खंडपीठाने मार्डचे अध्यक्ष आणि सचिवांची कानउघाडणी केली.

'न्यायालयात खोटी हमी देणाऱ्या या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात येतील,'' असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

'संप मागे घेत असल्याची लेखी हमी द्या. शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आश्‍वासन द्या. कामावर रुजू न होणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करण्यास मार्डची हरकत नसेल, असे प्रतिज्ञापत्र सादर करा,'' असे निर्देश न्यायालयाने मार्डच्या प्रतिनिधींना दिले. त्यानंतर दुपारी 3 वाजता पुन्हा सुरू झालेल्या सुनावणीत हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

'कुणाच्या जिवापेक्षा मागण्या मोठ्या नाहीत'
कामावर रुजू न होणाऱ्या डॉक्‍टरांवरील कारवाईबाबत आम्ही हस्तक्षेप करणार नाही. रुग्णालय प्रशासनाने त्याबाबत निर्णय घ्यावा, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. तुमच्या मागण्या कुणाच्या जिवापेक्षा मोठ्या नाहीत, असेही खंडपीठाने संपकरी डॉक्‍टरांना बजावले. संपकाळात बऱ्याच शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. त्यामुळे उद्यापासून त्या तातडीने पूर्ण करा, असे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली.

सहनशीलतेचा अंत पाहू नका
संपकरी डॉक्‍टरांबद्दल जेवढी सहानुभूती दाखवायची होती, ती गुरुवारी दाखवली. आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. कामावर रुजू होण्यासाठी निवासी डॉक्‍टरांना शेवटची संधी देत आहोत, अशा शब्दांत खंडपीठाने डॉक्‍टरांना सुनावले.

Web Title: high court talking to doctor