रंगांधळ्या विद्यार्थ्यांबाबत नियमावली तयार करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

मुंबई : ग्रॅंट मेडिकल कॉलेजमधील परिचर्या (नर्सिंग) अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्याचा प्रवेश रंगआंधळेपणामुळे रद्द करण्यात आला होता. याबाबत इंडियन नर्सिंग कौन्सिल (आयएनसी) आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन महासंचालनालयाने (डीएमईआर) दोन आठवड्यांत निर्णय घ्यावा, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 10) दिला.

राज्य सरकारने रंगांधळ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी नियमावली तयार करावी, तसेच त्यांना शिक्षणात अत्याधुनिक साधनांचा वापर कसा करता येईल याबाबत निर्णय घ्यावा, असा आदेशही न्यायालयाने दिला. 
रविकांत नाईक या विद्यार्थ्याने परिचर्या अभ्यासक्रमासाठी भायखळा येथील जे. जे समूह रुग्णालयाच्या ग्रॅंट वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. बी.एस्सी. (नर्सिंग) अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात गेल्यानंतर त्याला वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले, त्या वेळी रुग्णालयातच झालेल्या चाचणीत तो रंगांधळा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी तो अपात्र असल्याचे स्पष्ट झाले; तरीही त्याला दुसरे वर्ष पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली. 

त्यानंतर अभ्यासक्रमाचे दुसरे वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा त्याच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. एकूण नऊपैकी आठ चाचण्यांत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्याचा प्रवेश रद्द करत असल्याची नोटीस महाविद्यालयाने दिली. प्रवेश वाचवण्यासाठी तसेच ही नोटीस रद्द करण्यासाठी त्याने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी मुख्य न्या. नरेश पाटील आणि न्या. एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. 

Web Title: High Courts Decision on Students Guidelines