विद्यार्थ्यांना हायटेक शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नवी मुंबई - अनेक क्षेत्रांत नावलौकिक मिळवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने आता शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारावर शिक्षण देण्यासाठी पहिली ते दहावीचे वर्ग व्हर्च्युअलमध्ये रूपांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या प्रस्तावाला शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. 

नवी मुंबई - अनेक क्षेत्रांत नावलौकिक मिळवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने आता शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारावर शिक्षण देण्यासाठी पहिली ते दहावीचे वर्ग व्हर्च्युअलमध्ये रूपांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या प्रस्तावाला शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. 

शिक्षण विभागाने तयार केलेल्या प्रस्तावाप्रमाणे महापालिकेच्या सर्व शाळांमधील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल क्‍लासरूमची सुविधा देण्यात येणार आहे. त्यानुसार ५०१ वर्गांमध्ये डिजिटल बोर्ड तयार करण्यात येणार असून, सर्व शाळांमध्ये ६३८ संगणक दिले जाणार आहेत. हा प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केले. विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल क्‍लासमध्ये शिकवण्याचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले आहे का? असा प्रश्‍न राष्ट्रवादीचे नगरसेवक देवीदास हांडे-पाटील यांनी विचारला. १५ लाखांचा प्रस्ताव असल्यास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली जाते; मात्र १४ कोटींचा एवढा महत्त्वाचा प्रस्ताव तो पण एकच पानाचा कसा? असे शिवसेनेचे नामदेव भगत यांनी विचारले.  

वर्गांमध्ये स्मार्ट बोर्ड लावण्यात येणार आहेत. एखाद्या स्मार्ट फोनप्रमाणे ते काम करतील. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, शिक्षक प्रभावीपणे काम करतील, अशी खात्री शिक्षण अधिकारी संदीप संगवे यांनी दिली. आपल्या कामकाजात ई-गर्व्हनन्सचा प्रभावी वापर करून नागरिकांना घरबसल्या सुविधा देणारी महापालिका आता विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्‍लासरूम उपलब्ध करून देणार आहे. महापालिकेने प्रशस्त अशा ५२ शाळांच्या इमारती बांधल्या आहेत; मात्र या शाळांमध्ये अद्ययावत शिक्षण देण्यासाठी संगणक, प्रोजेक्‍टर, इंटरनेट अशा काही बाबी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे या शाळा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मागासल्या होत्या. त्याला छेद देण्यासाठी प्रशासनाने महापालिकेच्या शाळांमधील वर्गखोल्या व्हर्च्युअल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

माईन्डटेक काम करणार
महापालिकेने तांत्रिक सल्लागार केपीएमजी यांच्या मार्गदर्शनानुसार १४ कोटी ४८ लाख ९२ हजार १७४ रुपयांची निविदा तयार करून प्रक्रिया राबवली. यात दोन निविदांचे लिफाफा उघडण्यात आले. त्यात माईन्डटेक इंडिया लिमिटेड यांची निविदा पात्र ठरली. संबंधित कंत्राटदाराने भरलेली निविदा महापालिकेच्या अंदाजापेक्षा आठ टक्के जास्त दराची असल्यामुळे महापालिकेने दर कमी करण्याची मागणी केली. त्यानुसार माईन्डटेक व्हर्च्युअल क्‍लासरूम तयार करून देखभाल करणार आहे.

Web Title: Hightech education for students