महामार्गांचे हस्तांतरण  शिवसेना-मनसे आमनेसामने! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

नवी मुंबई - महापालिका हद्दीतील राज्य व राष्ट्रीय महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या मागणीवरून शिवसेना आणि मनसे आमनेसामने आले आहेत. महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला मनसेने विरोध केला आहे. शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटणकर यांनी दिलेला हा प्रस्ताव फेटाळावा, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने महापौर सुधाकर सोनवणे यांच्याकडे केली आहे. 

नवी मुंबई - महापालिका हद्दीतील राज्य व राष्ट्रीय महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या मागणीवरून शिवसेना आणि मनसे आमनेसामने आले आहेत. महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला मनसेने विरोध केला आहे. शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटणकर यांनी दिलेला हा प्रस्ताव फेटाळावा, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने महापौर सुधाकर सोनवणे यांच्याकडे केली आहे. 

देशातील महामार्गांवरील अपघातांमध्ये दारूच्या नशेत वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटरच्या आत दारू विक्रीवर बंदी घातली आहे. न्यायालयाच्या या आदेशाचा फटका राज्यातील सर्व महामार्गांवरील हॉटेल व्यवसायिकांना बसला आहे. हॉटेलमध्ये दारू नसल्याने ग्राहकांनी पाठ फिरवल्याने त्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. सायन-पनवेल महामार्गावर जेडब्ल्यू मेरियटसारखे पंचतारांकित हॉटेल सुरू होणार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाने त्यांचेही धाबे दणाणले आहेत. महापालिकेच्या मुख्यालयाशेजारचा नेरूळ-जेएनपीटी बायपास हा राष्ट्रीय महामार्गात येत असल्याने तेथील हॉटेलांमधील दारूविक्री बंद झाली आहे. तुर्भे सायन-पनवेल महामार्गाशेजारी असल्याने तेथील आणि महापे परिसरातील हॉटेलमधील दारूविक्रीवर यामुळे गंडांतर आले आहे. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी पुढाकार घेत महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्याला नवी मुंबईतील मनसेच्या महिला शहर उपाध्यक्ष डॉ. आरती धुमाळ यांनी विरोध केला आहे. महापौर व आयुक्तांनी शिवसेनेच्या या प्रस्तावाचा विचार करू नये, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेऊन केली. सोनवणे यांनीही मनसेच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या प्रस्तावाचा विचार होणार नाही, अशी अपेक्षा मनसेच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली. 

पक्षांतर्गत दोन भूमिका 
महामार्ग हस्तांतरणाला शिवसेनेचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विरोध केला होता. त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते; परंतु नवी मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेवकांना त्याचा विसर पडल्याचे व पक्षात दोन भूमिका असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. रावते यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या एका पत्राची प्रत हवी तर पाटकर यांना देऊ, असे मनसेच्या शहर उपाध्यक्ष अनिथा नायडू यांनी सांगितले. 

नवी मुंबईचा झपाट्याने होणारा विकास लक्षात घेता सायन-पनवेल महामार्गावर पंचतारांकित हॉटेल सुरू करण्यास व्यावसायिक इच्छुक आहेत; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ते येथे हॉटेल सुरू करण्यास धजावणार नाहीत. महापालिकेकडे महामार्ग हस्तांतर झाल्यास हॉटेल व्यवसायाला चालना मिळेल. त्यामुळे शहरातील बेरोजगारांना रोजगार मिळेल. 
- किशोर पाटकर, नगरसेवक. 

Web Title: Highway transfer Shivsena-MNS face