अयोध्या निकालाचे हिंदू- मुस्लिम बांधवांकडून स्वागत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर कल्याण- डोंबिवली शहरात आज दिवसभर शांतता होती.  हिंदू-मुस्लिम बांधवांनी निकालाचे स्वागत केले.

ठाणे : राम जन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालय शनिवारी (ता.9) निकाल देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे या निकालानंतर ठाण्यात कडेकोट बंदोबस्तातील शांततेचे वातावरण पाहायला मिळाले. ठाण्यामध्ये मंदिर, मशीद, राजकीय पक्षांची कार्यालय, संवेदनशील ठिकाणे, रेल्वेस्थानक, बस आगार अशी गर्दीची ठिकाणे अशा विविध ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले होते. ठाणे रेल्वेस्थानक परिसरात तर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कळवा व मुंब्य्रात हिंदू-मुस्लिम बांधवांनी निकालाचे स्वागत केले.

कल्याण शहरात शांतता
कल्याण :
अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर कल्याण- डोंबिवली शहरात आज दिवसभर शांतता होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या चौकात बंदोबस्त तैनात केला होता, अशी माहिती कल्याणचे सहायक पोलिस उपायुक्त अनिल पोवार यांनी दिली. शहरातील काही संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला होता. नागरिकांनी अत्यंत संयमाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. 

निकालाबाबत हिंदू संघटना समाधानी
मुरबाड :
राम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर हिंदू संघटनांनी समाधान व्यक्त केले. कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. तालुक्‍यातील हिंदू-मुस्लिम समाजातील लोकांनी प्रशासनास चांगले सहकार्य केले, असे पोलिसांनी सांगितले. मुरबाड येथील राम मंदिर व शिवाजी चौक परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

निकालाचे मुस्लिम संघटनेकडून कौतुक
उल्हासनगर :
अयोध्या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उल्हासनगरातील अहलेवतन मुस्लिम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संघटक मैनुद्दीन शेख यांनी जाहिररीत्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.

भिवंडीत निकालाचे स्वागत
भिवंडी :
 श्रीराम मंदिर जन्मभूमी-बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी दिलेल्या निर्णयाचे भिवंडीतील हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत स्वागत केले.

रायगडमध्ये पोलिसांचा बंदोबस्त
अलिबाग :
 अयोध्येच्या निकालाच्या या पार्श्‍वभूमीवर रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. जिल्ह्यात
 दोन हजार ४६४ पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड तसेच दोन राज्य राखीव पोलिस दलाचे प्लाटून असा ताफा सुरक्षेसाठी सज्ज ठेवण्यात आला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindu-Muslim welcome to the Supreme Court verdict in Ayodhya case