शिंदे सरकारच्या स्थगितीचा फटका; किहीम पक्षी निरीक्षण केंद्राचे काम रखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kihim Bird Observation Centre

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय पक्षितज्ञ डॉ. सलीम अली स्मरणार्थ किहीम अलिबाग येथे पक्षी अभ्यास व संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे.

शिंदे सरकारच्या स्थगितीचा फटका; किहीम पक्षी निरीक्षण केंद्राचे काम रखडले

मुंबई - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय पक्षितज्ञ डॉ. सलीम अली स्मरणार्थ किहीम अलिबाग येथे पक्षी अभ्यास व संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे. याचे महिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम मात्र गेल्या चार महिन्यापासून रखडले आहे. डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनी म्हणजे १२ नोव्हेंबर ला या अभ्यास केंद्राचे लोकार्पण करायचे होते. मात्र नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी मविआ सरकारच्या निर्णयांना दिलेल्या स्थगितीचा फटका अभ्यास केंद्राला बसला आहे. त्यामुळे अर्धवट उभं असलेले बांधकाम जीर्ण झाले असून कोसळण्याच्या अवस्थेत आहे. सरकारने दिलेली स्थगिती उठून केंद्राचे पुन्हा काम सुरू व्हावे यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे. 

डॉ. सलीम अली यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारने ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर हा पक्षी सप्ताह घोषित केला आहे. डॉ. सलीम अली यांनी किहीम, अलिबाग येथे आयुष्याचा बराच वेळ घालवला आणि पक्ष्यांचे आणि त्यांच्या प्रजननाचा अभ्यास केला. तत्कालीन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी डॉ. सलीम अली यांच्या सन्मानार्थ, वनविभाग अलिबागमध्ये पक्षी केंद्र सुरू करण्याची कल्पना मांडली. त्यासाठी रायगड जिल्हा परिषद,वन विभाग यांच्या माध्यमातून पक्षी निरीक्षण व अभ्यास केंद्राचे काम सुरू करण्यात आले. ११ जानेवारी २०२२ राजी आदिती तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

याबाबत बोलतांना माजी राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की डॉ. सलीम अली यांनी आपल्या आयुष्यातील महत्वाचा काळ हा किहीम मध्ये व्यतीत केला. तिथे त्यांनी पक्षी निरीक्षणाचे महत्वाचे काम केले. त्यामुळे त्यांची आठवण म्हणून तसेच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने अभ्यास केंद्र सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. अलिबाग,किहीम येथील पर्यटन वाढून अलिबागमधील पक्षी पर्यटनाला चालना मिळेल हा यामागील विचार होता असे ही तटकरे म्हणाल्या. नविन सरकार आपण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगतात. मात्र त्यांच्या स्थगितीमुळेच पर्यटन विकासाच्या कामाला खीळ बसली असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

किहीम मधील १२० वर्ष जुनी ब्रिटिशकालीन शाळा गेल्या १० वर्षांपासून बंद होती. त्याठिकाणी हे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. जुन्या शाळेची डागडुजी करून तसेच त्यात काही नवीन बांधकामे करून दोन टप्प्यात काम काम पूर्ण केले जाणार होते. पहिल्या टप्प्यात ५५ लाख तर दुसऱ्या टप्प्याचे काम १.२ कोटी रुपयांचे काम केले जाणार होते. यातील पहिल्या टप्प्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम स्थगिती मुळे रखडले आहे. या कामाला परवानगी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असून या कामाला सरकार परवानगी देईल अशी अपेक्षा असल्याचे अलिबागचे उप वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी सांगितले.

रायगड हा असाच एक अनोखा जिल्हा आहे जिथे आपल्याकडे जमिनीपासून समुद्रापर्यंत सर्व प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास आहे.म्हणूनच पक्षी पर्यटन केंद्र म्हणून त्याचा प्रचार केला जाऊ शकतो. अलिबागमधील पक्षी केंद्र आणि पक्षी पर्यटन उपक्रमांसाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएम)च्या मदतीने अभ्यास केंद्र उभारले जात आहे. पद्मभूषण आणि पद्मविभूषण डॉ. सलीम अली यांनी पक्षी अभ्यास व पक्षी संरक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य बी.एन.एच.एस या संस्थेच्या माध्यमातून खर्ची घातले. त्यांच्या नावाने त्यांच्याच किहीम या गावी हे पक्षी अभ्यास केंद्र महाराष्ट्र शासन उभारत आहे हे कौतुकास्पद आहे. ही वास्तू उभी होताच बी.एन.एच.एस येथे पक्षी अभ्यासासाठी लागणाऱ्या गोष्टी उपलब्ध करेल. हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा ही आमची अपेक्षा आहे असे बी.एन.एच.एस.चे मानद सचिव,किशोर रिठे यांनी सांगितले. 

डॉ. सलीम अली (१२ नोव्हेंबर १८९६-२० जून १९८७) आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय पक्षितज्ञ म्हणून ओळखले जातात. भारतीय उपखंडातील पक्ष्यांच्या निरिक्षणासाठी आखलेल्या विविध अभ्यास मोहिमा, दुर्मिळ पक्ष्यांचे लावलेले शोध, तसेच पक्ष्यांसंबंधी लिहिलेले अनेक गंथ यांकरिता सलीम अली प्रसिद्ध आहेत. त्यांचे कार्य पक्षिविज्ञानाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा समजला जातो.