चर्चगेटमध्ये होर्डिंग कोसळून एकाचा मृत्यू 

चर्चगेटमध्ये होर्डिंग कोसळून एकाचा मृत्यू 

मुंबई - गुजरातच्या दिशेने सरकणाऱ्या "वायू' चक्रीवादळाचा बुधवारी मुंबईला दणका बसला. चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या इमारतीवरील महात्मा गांधींचे चित्र असलेल्या होर्डिंगचे पत्रे कोसळून पादचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. वांद्रे पश्‍चिमेतील स्कायवॉकचे पत्रे पडून तिघी गंभीर जखमी झाल्या. मानखुर्द येथे वाऱ्यामुळे उच्च दाबाची वीजवाहिनी घराला चिकटल्याने झालेल्या स्फोटात काही घरांच्या छतावरील पत्रे फुटले आणि भिंतींची पडझड झाली. यात तीन महिला जखमी झाल्या. माहीम चौपाटीवरील दोन बोटी समुद्रात वाहून गेल्या, तर अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. 

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आज ताशी 55 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्याचा परिणाम संपूर्ण शहरात जाणवत होता. चर्चगेट स्थानकाच्या इमारतीवर महात्मा गांधींचे 15 फुटांचे चित्र तयार करण्यात आले आहे. आज दुपारी 12.45 च्या सुमारास या चित्राच्या होर्डिंगचे सहा चौकोनी भाग पादचारी मधुकर नार्वेकर (वय 63) यांच्या अंगावर कोसळले. त्यांना तत्काळ जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत इतर दोघे जखमी झाले. त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. नार्वेकर यांच्या कुटुंबीयांना पश्‍चिम रेल्वेने पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत नार्वेकर यांच्या नातेवाइकांचा शोध लागला नव्हता. दरम्यान, या घटनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. 

मानखुर्द येथील मंडाले परिसरातील इंदिरानगरमध्ये दुपारी दीडच्या सुमारास उच्च दाबाच्या वीजवाहिनीच्या स्फोटात काही घरांच्या छतावरील पत्रे फुटले आणि भिंतींची पडझड झाली. या दुर्घटनेत स्वागता साळुंखे (22), रंजना मुत्तल (37) आणि सुशीला गुप्ता (35) या महिला जखमी झाल्या. त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. या घटनेत काही घरांचे पत्रे फुटले, भिंतींची पडझड झाली; तसेच काही घरांतील विद्युत उपकरणे आणि मीटर बॉक्‍सचे नुकसान झाले. 

वांद्रे पश्‍चिमेतील स्वामी विवेकानंद मार्गावरून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या या स्कायवॉकच्या सुशोभीकरणासाठी बसवण्यात आलेले ऍक्रॅलिकचे पत्र दुपारी कोसळले. त्यात तेजल कदम (वय 27), मलिशा नजरात (30) आणि सुलक्षणा वझे (41) गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ होली फॅमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. 

दोन बोटी वाहून गेल्या 
वादळाच्या परिणामामुळे मुंबईत समुद्र खवळलेला होता. माहीम चौपाटीवरील दोन बोटी समुद्रात वाहून गेल्या. त्यामुळे पोलिसांनी माहीमसह गिरगाव चौपाटीवर पर्यटकांना बंदी घातली आहे. अनेक समुद्रकिनाऱ्यांवर जोरदार वारे, पाऊस आणि लाटांच्या तुषारांमुळे दृश्‍यमानता कमी झाली होती. तरीही चौपाट्यांवर पर्यटकांनी पावसात चिंब होणे पसंत केले. 

मॉन्सूनचे आगमन लांबले 
अरबी समुद्रातील "वायू' वादळामुळे मॉन्सून शनिवारपर्यंत केरळमध्येच राहणार आहे. हे वादळ क्षीण झाल्यानंतर रविवारी मॉन्सून दक्षिण कोकणात पोचेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील मॉन्सूनचे आगमन आणखी लांबणार आहे. हवेतील आवश्‍यक बाष्प चक्रिवादळाने खेचल्यामुळे मॉन्सूनचा प्रवास थांबला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com