धक्कादायक : मार्चपासून या महापालिकेच्या 7 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू; एका उपअभियंत्याचा समावेश 

सुजित गायकवाड
Thursday, 3 September 2020

नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोनाचा विळखा आता महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतू लागला आहे. कोरोनासोबत दोन हात करून सर्वसामान्यांना सुविधा पुरविताना महापालिकेच्या 65 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे.

नवी मुंबई : शहरातील वाढत्या कोरोना संगर्गासोबत लढणाऱ्या कोरोना योद्‌ध्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त, विभाग प्रमुख, एनएमएमटी व्यवस्थापक, उपअभियंता, डॉक्‍टर, परचारिका आणि वाहन चालकांसह विविध वर्गातील 65 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाने विळख्यात घेतले आहे. कोरोनाची लागण झालेल्या 65 जणांपैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन वाहनचालक आणि एका उपअभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. 

हे वाचा : रियाचा द्वेष पाहून फार वाईट वाटतेय

नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोनाचा विळखा आता महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतू लागला आहे. कोरोनासोबत दोन हात करून सर्वसामान्यांना सुविधा पुरविताना महापालिकेच्या 65 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या दोन अतिरिक्त आयुक्तांपैकी आरोग्य विभागाचा कामकाज असणाऱ्या एका अतिरिक्त आयुक्तांना कोरोनाची लागण झाली आहे; परंतु आता त्यांची प्रकृती सुधारल्याने ते पुन्हा ते दोन दिवसांपूर्वीच सेवेत रूजू झाले आहेत. एनएमएमटीचे व्यवस्थापकांसह एका वाहतूक निरीक्षकालाही कोरोनाची लागण झाली होती. त्याआधी आरोग्य विभागातील सहायक वैद्यकीय अधिकारी, डॉक्‍टर, परिचारिकांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आरोग्य विभागात अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. सध्या 5 डॉक्‍टर, चार परिचारिकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 

हे वाचा : दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा लांबणीवर

मार्च महिन्यात नवी मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या वाशी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेवरील चालकाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला. या मृत्यूपासून महापालिकेत कोरोनाचे तांडव सुरू झाले. ऑगस्टपर्यंत तब्बल सात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. यात अभियांत्रिकी विभागातील एका होतकरू उपअभियंत्याचाही मृत्यू झाला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hocking: 7 employees of Navi Mumbai Municipal Corporation have died due to corona since March; Including a Deputy Engineer