
कोपरखैरणे भागात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी शुक्रवारी (ता. 20) भरदिवसा कोपरखैरणे सेक्टर 15 मधील आणखी दोन घरांत चोरी केल्याचे समोर आले आहे.
नवी मुंबई : कोपरखैरणे भागात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी शुक्रवारी (ता. 20) भरदिवसा कोपरखैरणे सेक्टर 15 मधील आणखी दोन घरांत चोरी केल्याचे समोर आले आहे. या वेळी या दोघा चोरट्यांनी तीन लाख नऊ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. गत आठवड्यात चोरट्यांनी भरदिवसा चार घरफोड्या करून लाखोंचा ऐवज चोरून नेला होता. त्यापाठोपाठ आता चोरट्यांनी आणखी दोन घरे फोडल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही बातमी वाचली का!- भिवंडीत आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या
कोपरखैरणे सेक्टर 15 मध्ये राहणारे बाळू गोविंदा शिंदे यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला. यात चोरट्यांनी रोख रक्कम आणि वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा सुमारे तीन लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी शिंदे यांच्या शेजारी राहणारे महेश पवार यांच्या स्वयंपाकगृहाच्या खिडकीवाटे प्रवेश करून त्यांच्या घरातील मोबाईल फोन चोरून नेला. महेश यांच्या पत्नी सायंकाळी 5.30 वाजता भाजी आणण्यासाठी गेल्या असताना चोरट्यांनी ही चोरी केली. त्यांनतर 6.15 वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्यानंतर घरात तसेच शेजारी राहणाऱ्या बाळू शिंदे यांच्या घरातदेखील चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
ही बातमी वाचली का!- महालक्ष्मी येथे लवकरच पशुवैद्यकिय रुग्णालय
गेल्या आठवड्यात चार घरफोड्या
मागील आठवड्यात चोरट्यांनी कोपरखैरणेत एका दिवसात चार वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांकडून या घरफोड्यांचा तपास सुरू असतानाच चोरट्यांनी आणखी दोन घरफोड्या केल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच दिवसाढवळ्या होणाऱ्या घरफोड्यांमुळे रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.