#HopeOfLife : देशात कर्करोगतज्ज्ञांचा दुष्काळ!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

केवळ दोन हजार डॉक्‍टरांवर भार; 66 टक्के रुग्ण खासगी रुग्णालयात 

मुंबई : देशात सात हजारांहून अधिक कर्करोगतज्ज्ञांची आवश्‍यकता असताना उपचारासाठी सध्या केवळ सुमारे दोन हजार डॉक्‍टर कार्यरत आहेत. 
66 टक्के कर्करोग रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.

कर्करोगाच्या उपचारामुळे साधारण सहा कोटी कुटुंबे दारिद्य्ररेषेखाली येतात. डॉक्‍टरांच्या अपुऱ्या संख्येमुळे कर्करोगावरील उपचारही महागडे होत आहेत. अशातच कर्करोगावरील उपचाराची 90 टक्‍क्‍यांहून अधिक रुग्णालये शहरी भागात असल्याने प्रवास आणि निवासखर्चात रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांचे कंबरडे मोडत आहे. 

हेही वाचा : एअरटेल ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी..

राज्यसभेने कॉंग्रेसचे खासदार जयराम रमेश यांच्या अध्यक्षतेखाली कर्करोगाच्या उपचारांसाठी शिफारस करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. देशभरात 300 खाटांच्या 20 रुग्णालयांची आणि 100 खाटांच्या 100 रुग्णालयांची गरज असल्याचे समितीच्या अहवालात म्हटले होते. मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयाच्या धर्तीवर या रुग्णांचे नियोजन करणेही गरजेचे असल्याचे रमेश यांनी नमूद केले होते. 

"अमेरिकन सोसायटी ऑफ क्‍लिनिकल ऑन्कोलॉजी'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारतातील सरकारी रुग्णालयांत एक कर्करोगतज्ज्ञ दररोज 120 च्या आसपास रुग्णांची तपासणी करतो, तर खासगी रुग्णालयातील डॉक्‍टरचे काम निम्मे आहे. सरकारी डॉक्‍टरांना रुग्णावरील उपचारांसह प्रशासकीय आणि महाविद्यालयांत शिकवण्याचेही काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्यावर अधिक ताण असतो. 

हेही वाचा : मेट्रो ट्रेन तोडते मुंबईकरांच पाणी

देशात कर्करोगावरील उपचाराची केवळ 27 रुग्णालये आहेत, तर कर्करोगासह इतर महत्त्वाच्या आजारावर उपचार करणारी सुमारे 300 रुग्णालये आहेत. यात सरकारी रुग्णालयांचे प्रमाण नगण्य आहे. महाराष्ट्राचा विचार करता 300 खाटांच्या तीन रुग्णालयांची गरज आहे. 

10 लाख नागरिकांमागे किती आहेत कर्करोगतज्ज्ञ? 
भारत ः 0.95 (साधारण एक डॉक्‍टर) 
चीन ः 15.39 
फिलिपिन - 25.63 
इराण ः 1.14 

 
रुग्ण वाढणार 
वाढत्या लोकसंख्येबरोबरच देशातील कर्करोग रुग्णांची संख्याही वाढणार आहे. 2018 च्या आकडेवारीनुसार भारतात एक लाख नागरिकांमागे 85 जण कर्करोग रुग्ण आहेत; तर 2035 मध्ये हे प्रमाण 110 आणि त्यापुढील पाच वर्षांत म्हणजेच, 2040 पर्यंत हे प्रमाण 125 पर्यंत पोहचणार आहे. 

2018 मधील नवे रुग्ण 
जगात ः 18078957 
भारतात ः 1157294 
महाराष्ट्रात 144032
 

2035 मधील नवे रुग्ण (अंदाजे) 
जगात ः 26842720 
भारतात ः 17,00,000 
महाराष्ट्रात ः 211650
 

कर्करोगामुळे मृत्यू 2018 
जगात ः 9555027 
भारतात ः 784821
 

2035 मध्ये होणारे मृत्यू (अंदाजे) 
जगात ः 14700704 
भारतात ः 13,00,000 

10 वर्षांत काय हवे? 
देशात... 
300 खाटांची 20 रुग्णालये 
100 खाटांची 100 रुग्णालये
 
महाष्ट्रात... 
300 खाटांची 3 रुग्णालये 
100 खाटांची 13 रुग्णालये
 

कर्करोग तज्ज्ञ डॉक्‍टरांची गरज 
300 खाटांच्या रुग्णालयांसाठी ः 209 
100 खाटांच्या रुग्णालयांसाठी ः 70 
(यात सर्जिकल, मेडिकल, रेडिएशन कर्करोगतज्ज्ञांसह भूलतज्ज्ञ, निवासी डॉक्‍टर, प्रयोगशाळेतील डॉक्‍टरांचाही समावेश) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #HopeOfLife : India needs more 7 thousand cancer specialist