Raigad : माथेरानच्या विकासाला घोडेवाल्यांचा लगाम? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

माथेरानच्या विकासाला घोडेवाल्यांचा लगाम?

माथेरान : पर्यटनाचा दर्जा वाढावा, यासाठी एमएमआरडीएने माथेरान शहरातील रस्त्याला ‘क्ले पेव्हर ब्लॉक’ बसवले. यामुळे परिसराच्या सौंदर्यात वाढ झाली. अपंग, ज्येष्ठ नागरिकांचा प्रवासही सोयीचा झाला. मात्र, या रस्त्याच्या उतारावरून घोडे घसरून पडण्याच्या घटना घडल्या. घोडेमालकांनी याबाबत पालिकेत तक्रार केली असता आता उतारावरील ‘क्ले पेव्हर ब्लॉक’ काढून टाकले आहेत. दरम्यान, हा खटाटोप शहराच्या विकासाला लगाम असल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत.

माथेरानमधील दस्तुरीपासून बाजारपेठ या दोन किलोमीटर अंतरापर्यंत जाण्यासाठी एमएमआरडीएतर्फे पर्यावरणपूरक रस्ते बनविण्यात येत आहेत. यापैकी सुमारे एक किलोमीटरपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे; परंतु या मार्गातील सखाराम तुकाराम पॉईंटपासून २०० मीटर अंतरावर असलेल्या उतारावरून ‘क्ले पेव्हर ब्लॉक’वरून घोडे घसरण्याच्या घटना घडल्या. यामध्ये घोडे आणि पर्यटकांना दुखापत झाली. घोडेवाल्यांची याबाबत नगराध्यक्षांकडे तक्रार केल्यानंतर मंगळवार (ता. १६) पासून एमएमआरडीएच्या कंत्राटदाराने उतारावरील १०० मीटरपर्यंत ‘क्ले पेव्हर ब्लॉक’ काढून टाकले. आता उतारावरून दगडाच्या ओबडधोबड रस्त्यावरून पायपीट करावी लागणार आहे.

उतारावरून घोडे घसरतात, अशा प्रकारच्या अश्वपालकांकडून तक्रारी येत असून यावर उपाययोजना म्हणून रस्त्याच्या कडेला गटार बांधणे आवश्यक आहे. सध्या काही भागातील पेव्हर ब्लॉक काढून हातरिक्षा, हातगाडी तसेच घोड्यांना चालण्यायोग्य रस्ता कशा प्रकारे करता येईल, यासाठी प्राधान्य दिले जाईल.

- प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा

महात्मा गांधी रस्त्याला क्ले पेव्हर ब्लॉक लागल्यामुळे हातरिक्षा ओढणे सोपे जात होते. जास्त जोर लावण्याची गरज पडत नव्हती; तसेच पूर्ण शरीराराची ताकद लागत नव्हती. पण आता हे क्ले पेव्हर ब्लॉक काढल्यामुळे आता पुन्हा आम्हाला जास्त ताकद लावावी लागणार आहे.

- प्रकाश सुतार, उपाध्यक्ष, हातरिक्षा संघटना

रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी आम्ही रिक्षा संघटनेच्या माध्यमातून एमएमआरडीएचे या अभियंता अरविंद धाबे यांना उतार कमी करण्याची सूचना केली होती. त्या वेळी एमएमआरडीएचे सल्लागार विजय पाटील हे उपस्थित होते. त्या वेळी उतार कमी करणार आहोत, असे स्पष्ट केले होते; पण अजूनही कार्यवाही झाली नाही.

- सुनील शिंदे, सामाजिक कार्यकर्ते

loading image
go to top