आगीला प्रशासनच जबाबदार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मुंबई - अंधेरीतील कामगार राज्य विमा योजना (ईएसआयसी) रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या आठ जणांच्या मृत्यूला रुग्णालयाचे प्रशासन आणि नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्‍शन कॉर्पोरेशन (एनबीसीसी) जबाबदार असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. प्रशासनाच्या निषेधार्थ कामगारांनी मंगळवारी (ता. 18) रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. रुग्णालयातील गैरसोयी आणि अनागोंदी कारभाराच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. यापूर्वीही रुग्णालयात आगीच्या किरकोळ घटना घडल्या होत्या, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

अंधेरी पूर्वेकडील ईएसआयएस रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम एनबीसीसीने नेमलेल्या कंत्राटदाराकडून 10 वर्षांपासून सुरू होते.
आगीतील जखमींचे जबाब नोंदवण्यासाठी एमआयडीसी पोलिसांची आठ पथके तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी आणखी दोन दिवस लागतील. अग्निशामक दलाच्या अहवालातून आगीचे कारण स्पष्ट झाल्यावर पोलिस पुढील कारवाई करणार आहेत. कलिना येथील न्यायसहायक वैद्यकीय प्रयोगशाळेच्या पथकाने मंगळवारी रुग्णालयातील वेगवेगळ्या विभागांची पाहणी केली. रबरावर पडलेल्या ठिणगीमुळे आग लागून धूर झाला, असे प्राथमिक पाहणीत उघड झाले आहे.

आगीतील मृतांची संख्या आठवर
अंधेरीतील कामगार राज्य विमा योजनेच्या रुग्णालयाला लागलेल्या आगीत होरपळलेल्या दोघांचा मंगळवारी (ता. 18) मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आठ झाली आहे. मृतांमध्ये दोन महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. रुग्णालयात लागलेल्या आगीत 177 जण जखमी झाले होते; त्यापैकी 28 जणांना उपचारांनंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. उपचार सुरू असलेल्या 141 जणांपैकी 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
Web Title: Hospital fire Administrative Responsibility