कोव्हिड रुग्णालयात महिला रुग्णाशी गैरवर्तन; नराधमास तरुणांनी दिला चोप...

दीपक शेलार
Wednesday, 29 July 2020

रुग्णालय प्रशासनाने कुठलीही कारवाई या कर्मचाऱ्यावर केली नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच याप्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी कापूरबावडी पोलिसात लेखी तक्रार दिली.

ठाणे : कधी मृतदेहाची अदलाबदल, तर कधी कोरोनामुक्त व्यक्तींना कोरोनाग्रस्तांच्या यादीत टाकणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळकुम येथील कोव्हिड सेटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्ण महिलेसोबत गैरवर्तन केल्याने एका विकृत कंत्राटी कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला. या घटनेचे चित्रण मंगळवारी सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर बुधवारी मनसेने कापूरबावडी पोलिसात अर्ज देऊन त्या विकृत कामगारावर आणि प्रकरण दडपण्यासाठी पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

वातावरण बदलासोबतच मुंबईकरांची चिंता वाढली; सर्दी, तापाचे रुग्णांच्या संख्येत वाढ....

सध्या सर्वत्र कोरोनाची साथ पसरत असल्याने दिवसागणिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. ठाण्यातील कोव्हिड सेंटर म्हणून घोषित करण्यात आलेल्या बाळकुम येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अनेक महिला व पुरुष रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयात दाखल असलेली कोरोना बाधित महिला रुग्ण स्वछतागृहात गेली असतांना याच रुग्णालयात काम करणाऱ्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याने तिला चोरून बघितले. सीसी टिव्ही चित्रणात हा प्रकार उघड झाल्यानंतर काही तरुणांनी या कर्मचाऱ्यास चोप देऊन रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात दिल्याचे चित्रण मंगळवारी व्हायरल झाले.

श्रावण महिन्यात बटाटा महागला; लसणाचे भावही चढेच, कांदा मात्र स्थिर....

मात्र रुग्णालय प्रशासनाने कुठलीही कारवाई या कर्मचाऱ्यावर केली नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच याप्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी कापूरबावडी पोलिसात लेखी तक्रार दिली. तसेच, या विकृत व्यक्तीवर कारवाई करण्यासह त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरदेखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत कापुरबावडी पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hospital servant misbehave with patient at covid hospital in thane