कांजूरमार्ग जंक्‍शनला तीन मेट्रो मार्गिका येणार एकत्र, फलाटांची लांबी वाढविण्यासाठी कोट्यावधींचा खर्च

तेजस वाघमारे
Thursday, 15 October 2020

आरे कॉलनीतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 चे कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्यात आले आहे.

मुंबई, ता. 15 : आरे कॉलनीतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 चे कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्यात आले आहे. त्यानुसार मेट्रो 3 ची मार्गिका साकीविहार स्थानकाजवळ स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या मेट्रो 6 मेट्रो जोडली जाईल. तसेच मेट्रो 3 च्या रेल्वेगाड्यांसाठी मेट्रो 6 च्या मार्गिकेवरील पाच ते सहा स्थानकांच्या फलाटांची लांबी वाढवावी लागणार असल्यामुळे सुमारे 100 ते 200 कोटी रुपयांची वाढ होईल. हा खर्च होणार असला तरी कांजूरमार्ग जंक्शन येथे तीन मेट्रो मार्ग जोडले जाणार असल्याने याचा फायदा लाखो प्रवाशांना होणार आहे.

मेट्रो 3 चे कारशेड आरेमध्ये उभारण्यास विरोध झाल्यानंतर ते कांजूरमार्ग येथे हलविण्यात आले आहे. या निर्णयामुळे एमएमआरडीएला मेट्रो 6 च्या मार्गिकेवर अनेक बदल करावे लागणार आहेत. मेट्रो 3 मार्गिका ही सीप्झपर्यंत भुयारी असून, त्यानंतर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या पलीकडे ती भुयारातून वर येते. मेट्रो 3 ची मार्गिका मेट्रो 6 वर साकी विहार आणि सीप्झ स्थानकाजवळ जोडण्याचे नियोजन MMRDA कडून सुरु आहे.

महत्त्वाची बातमी : "तुमचं कार्यालय वरळीला आहे आणि फ्लोरा फाऊंटन तिथून जवळ आहे" म्हणत सुप्रीम कोर्टाने रिपब्लिकला फटकारलं

मेट्रो 3 आठ डब्यांची आहे. तर मेट्रो 6 सहा डब्यांची आहे. त्यामुळे मेट्रो 3 मार्गिका जेथून जोडली जाईल, त्यापुढील पाच ते सहा स्थानकांतील फलाटांची लांबी वाढवावी लागणार आहे. यासाठी 100 ते 200 कोटी रुपये अतिरिक्त खर्च अपेक्षित असल्याचे MMRDA तील अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रो 6 प्रकल्प 2022 च्या अखेरीस पूर्णत्वास जाणार आहे. कांजूरमार्ग येथे कारशेड बनविण्यासाठी 100 एकर जमीन मिळाली असून या जमिनीवर मेट्रो ६ चे स्वतंत्र आणि मेट्रो ३ चे स्वतंत्र कारशेड उभारण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी कांजूरमार्ग बदलापूर या मेट्रो मार्गासाठी स्टेबलिंग लाइन ही उभारण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

महत्त्वाची बातमी : धारावीत पोलिसांची छापेमारी, जप्त केलं अडीच कोटींचं हेरॉईन

मेट्रो 3 चे कारशेड कांजूरमार्ग येथे हलविल्यात आल्याने याचा प्रवाशांनाही लाभ होणार आहे. कांजूरमार्ग जंक्शन येथे तीन मार्गिका एकत्र येणार आहेत. पूर्वी मेट्रो 6 आणि मेट्रो 14 ही दोन स्थानके उपलब्ध होत होती. आता मेट्रो 3 चे स्थानकही येथे जोडले जाणार असल्याने बदलापूरहुन थेट कुलाबापर्यंतचा प्रवास प्रवाशांना शक्य होणार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

three metro lines will junction in kanjurmarg height lifting of platform will result into increased budget


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three metro lines will junction in kanjurmarg height lifting of platform will result into increased budget