अतिवृष्टीने नागरिकांच्या काळजाचे पाणी!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

कळव्यात घर कोसळले; खारीगाव, विटाव्यात जनजीवन विस्कळीत

कळवा ः कळवा परिसरात शनिवारी (ता.3) सांयकाळी घेतलेल्या विश्रांतीनंतर रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पहाटे चारच्या सुमारास सखल भागात पाणी भरले. यामुळे कळव्यासह खारीगाव आणि विटावा परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

रविवारी (ता.4) पुन्हा कळवा रेल्वे स्थानकाजवळील न्यू शिवाजी नगरमध्ये शिवाजी तलावाचे आणि जवळच्या नाल्याचे पाणी घुसल्याने पूर्ण शिवाजी नगर पाण्याखाली गेले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने महापालिका आपत्कालीन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. 

शिवाजी नगर परिसरात दुपारी 12 च्या सुमारास याच परिसरातील शांतीनगर झोपडपट्टीमधील मोहम्मद सिकंदर शेख यांचे घर कोसळले; मात्र कोणीही जखमी झाले नाही. कळवा खाडीचे भरतीचे पाणी जानकीनगर, सायबा नगर, विटावा सुर्यनगर, खारीगाव परिसरातील चाळीमध्ये घुसले, तर कळवा परिसरातील सखल भागातील मुंबई-पुणे रस्त्यावर नाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने मुंब्रा आणि खारीगाव वरून येणारी वाहने सुमारे अर्धा तास थांबवण्यात आली.

सह्याद्री सोसायटी आणि भवानी सोसायटीमध्ये पाणी शिरले, तर सह्याद्री शाळेच्या तळमजल्यापर्यंत पाणी घुसल्याने तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते. सकाळच्या सुमारास कळवा स्थानकात प्रचंड पाणी साठल्याने रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले होते. दुपारनंतर पाणी ओसरल्यावर येथील जीवन पूर्वपदावर आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The house collapsed in Kalwa near Mumbai