महिला चातकासारखी वाट पाहतायेत 'त्यांची'...!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

डिसेंबर, जानेवारी महिना सुरू झाला, की वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कच्च्या कैऱ्यांची आवक सुरू होते. फेब्रुवारीपर्यंत ही आवक हळूहळू वाढण्यास सुरुवात होते; मात्र, यंदा अजूनही आंबा बागांना हवा तसा मोहोर आलेला नाही. त्यामुळे लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांसाठी गृहिणींना आणखी दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. 

नवी मुंबई : डिसेंबर, जानेवारी महिना सुरू झाला, की वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कच्च्या कैऱ्यांची आवक सुरू होते. फेब्रुवारीपर्यंत ही आवक हळूहळू वाढण्यास सुरुवात होते; मात्र या वेळी या कच्च्या कैऱ्यांचा हंगाम लांबला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केवळ एक-दोन गाड्या दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यंदा अजूनही आंबा बागांना हवा तसा मोहोर आलेला नाही. त्यामुळे लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांसाठी गृहिणींना आणखी दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. 

ही बातमी वाचली का? गणेश नाईकांना मोठा धक्का; कट्टर समर्थक सोडतायेत साथ...

यंदा पावसाचा फटका बसल्याने अनेक ठिकाणच्या आंबा बागांना अजूनही मोहोर आलेला नाही. परिणामी, कच्च्या कैऱ्या मिळणे दुरापास्त झाले आहे. दरवर्षी फेब्रुवारीपासून घाऊक बाजारात कच्च्या कैऱ्यांच्या आठ ते १० गाड्या दाखल होतात; मात्र सध्या केवळ एक ते दोनच गाड्या आवक होत आहे. या हंगामातील पहिल्या कैऱ्या असल्याने त्या चवीला अतिशय आंबट आहेत. त्यामुळे मीठ लावून किंवा साखरेच्या पाकात बुडवून खाण्यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. किरकोळ बाजारातही कैऱ्यांना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे; मात्र मागणीइतका पुरवठा बाजारात होत नाही. ज्या काही कैऱ्या येत आहेत, त्यांनाही अधिक दर द्यावा लागत आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? १६ फेब्रुवारीला कामोठ्यात चला हवा येऊ द्या

घाऊक भाजीपाला बाजारात या कालावधीत कच्च्या कैरीची दररोज १५ ते २० गाड्या आवक होत असते. महाराष्ट्रासह गुजरात आणि दक्षिण भारतातून तमिळनाडूमधून मोठ्या प्रमाणात कच्च्या कैऱ्या बाजारात येत असतात. यामध्ये तोतापुरी, नीलम आणि अनेक देशी कैऱ्यांचा समावेश आहे. लोणची बनवण्यासाठी मकराम जातीच्या मोठ्या गोल कैऱ्या आवर्जून वापरल्या जातात. ऊन वाढले की कैरीचे पन्हे बनवण्यासाठी काही प्रमाणात दररोजच्या जेवणात, कच्च्या खाण्यासाठी आणि सर्वाधिक लोणची बनवण्यासाठी या कैऱ्यांचा वापर केला जातो. 

ही बातमी वाचली का? तळोजा येथे बसला अपघात

५० ते ६० रुपये किलो
आठवडाभरापासून या कच्च्या कैऱ्या सुरू झाल्या असून त्यांचा दरही अधिक आहे. सध्या घाऊक बाजारात ५० ते ६० रुपये किलो; तर किरकोळ बाजारात २० ते ३० रुपये पाव किलो दराने या कच्च्या कैऱ्या उपलब्ध आहेत. त्याही अगदी तुरळक प्रमाणात पाहायला मिळत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Housewives waiting for pickled mangos!