#HopeOfLife : वैद्यकीय मदत मिळेल; खचून जावू नका!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 January 2020

रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांची होणारी परवड लक्षात घेऊन सरकारसह काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. याबाबतची माहिती घेऊन आवश्‍यक कागदपत्रांसह त्यांच्याशी संपर्क साधल्यास मोठा आधार मिळतो.

मुंबई : कर्करोग किंवा इतर दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींवर तसेच त्याच्या कुटुंबावर केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक आणि आर्थिक आघातही होत असतो. रुग्णावरील उपचार, आवश्‍यक चाचण्या, त्यासाठी करावी लागणारी धावपळ आदींमुळे त्यांच्या कुटुंबाला अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. तसेच या आजारावर होणाऱ्या खर्चामुळे कुटुंबीयांपुढे आर्थिकदृष्ट्या अनेक अडचणी असतात; मात्र अशा वेळी खचून न जाता परिस्थितीचा धैर्याने सामना करणे आवश्‍यक आहे. रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांची होणारी परवड लक्षात घेऊन सरकारसह काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. याबाबतची माहिती घेऊन आवश्‍यक कागदपत्रांसह त्यांच्याशी संपर्क साधल्यास मोठा आधार मिळतो.

हेही वाचा#HopeOfLife : कर्करोगावर भारतातच दर्जेदार उपचार

वैद्यकीय मदत मिळविण्याची प्रक्रिया
वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी प्रथम काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार केला पाहिजे. ज्या कारणासाठी वैद्यकीय मदत हवी आहे, ती शस्त्रक्रिया किंवा उपचार ज्या रुग्णालयातून करून घेतले जाणार आहेत, त्याबाबतचे लेखी पत्र घेणे आवश्‍यक आहे. सदर पत्रात रुग्णाला झालेल्या आजाराची थोडक्‍यात माहिती आणि त्यासाठी कोणते उपचार आणि शस्त्रक्रिया केली जाणार आहे, याची माहिती दिली जाते. तसेच या उपचारांना लागणारा कालावधी, शस्त्रक्रियेची नियोजित तारीख आणि त्यासाठी येणारा अंदाजे खर्च याबाबतही माहिती दिलेली असते. हे पत्र मान्यताप्राप्त रुग्णालयाकडून दिले जाते. तसेच पत्रावर संबंधित रुग्णालयांच्या प्रमुखांची सही आणि शिक्का असणे आवश्‍यक आहे. याच पत्रामध्ये रुग्णालयाच्या बॅंक खात्याची माहिती, फोन क्रमांक आदी असल्याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून वैद्यकीय मदत संबंधित खात्यात जमा केली जाते.

ही बातमी वाचली का : #HopeOfLife : पतीपाठोपाठ पत्नीचीही कर्करोगाशी लढाई

वैद्यकीय मदत मिळवताना रुग्णालयाकडून आजाराचे निदान, त्यावरील शस्त्रक्रिया, उपचार आणि त्यासाठी होणाऱ्या खर्चाचे विवरण मिळवल्यानंतर रुग्णाची आर्थिक परिस्थिती आणि आजाराचे स्वरूप पाहून ३० ते ६० दिवसांनंतर शस्त्रक्रियेची तारीख ठरवावी. त्याच वेळी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला आणि प्रमुख डॉक्‍टरांना स्पष्ट शब्दांत कल्पना द्यावी की शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी आम्ही वैद्यकीय मदत मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच त्यांना रुग्णाच्या नावाने रुग्णालयाच्या बॅंक खात्यात वैद्यकीय मदत जमा होणार आहे, याचीही कल्पना द्यावी. त्यानुसार रुग्णालयाचे व्यवस्थापन संबंधित बॅंकेला सूचना देतील.

वैद्यकीय मदतीसाठी अर्ज करताना घ्यावयाची काळजी

  • वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याचा प्रसंग आल्यावर रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांची मानसिक अवस्था गोंधळलेली असते. सर्वांवर दडपण आलेले असते. अशा वेळी कुटुंब, नातेवाईक किंवा मित्रमंडळींपैकी एका जबाबदार व्यक्तीवर मदत मिळवण्याबाबतची प्रक्रिया पार पडण्याची जबाबदारी सोपवावी. त्या व्यक्तीने संबंधित प्रक्रिया नीट समजावून घ्यावी. ते शक्‍य नसल्यास या क्षेत्रातील समाजसेवकाची मदत घ्यावी. मोठ्या रुग्णालयांमध्ये आणि विविध शहरामध्ये असे समाजसेवक काम कार्यरत असतात.
  • वैद्यकीय मदतीची गरज आपल्याला आहे, तेव्हा आपले वर्तन विनम्रपणाचे आणि शांततेचे असावे. कुठेही मदत मागताना किंवा कागदपत्रे गोळा करताना घाई करू नये, आरडाओरड करू नये, निराश होऊ नये, मदत देणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींशी सौहार्दपूर्ण व्यवहार ठेवावा. आपल्याला मदत मिळवून आपल्या प्रिय व्यक्तीवर उपचार करायचे आहेत हे लक्षात ठेवावे. मदत देणाऱ्याला शक्‍य आहे, तेवढी मदत तो नक्की देणार असल्याचा विश्‍वास बाळगावा.
  • वैद्यकीय उपचारासाठी शक्‍यतो कर्ज काढू नये. अशावेळी मानसिकता विचलित होण्याची शक्‍यता असते. खोटी आश्वासने आणि मोठमोठ्या गप्पांवर विश्वास ठेवू नये. ज्यांना प्रत्यक्ष वैद्यकीय मदत मिळाली आहे त्यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन घ्यावे.
  • आपल्या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांना भेटून कुठून मदत मिळवता येईल का ते पाहावे. मदत मागताना न्यूनगंड किंवा अपराधीपणाची भावना नसावी. इतरांच्या अनुभवावरून विचलित होऊ नये. आपल्यासारखी परिस्थिती अनेकांवर येते. त्यामुळे खचून न जाता प्रयत्न करावेत. आपल्याला नक्की मदत मिळेल आणि आपल्या प्रिय व्यक्तीवरील उपचार किंवा शस्त्रक्रिया नक्की यशस्वी होतील, असा विश्वास बाळगावा.
  • वैद्यकीय मदत मिळाल्यावर मदत देणाऱ्या संस्था वा व्यक्तींचे आभार मानावे किंवा तशा आशयाचे पत्र पाठवावे. त्यांनी दिलेल्या मदतीची कृतज्ञता म्हणून त्यांना पत्र पाठवणे हे चांगुलपणाचे लक्षण आहे. आपणही भविष्यात अशा संस्थांना मदत करावी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to avail fianancila help during medical emergency