esakal | #HopeOfLife : कर्करोगावर भारतातच दर्जेदार उपचार  
sakal

बोलून बातमी शोधा

#HopeOfLife : कर्करोगावर भारतातच दर्जेदार उपचार  

आजकाल कर्करोगाच्या उपचारासाठी परदेशात जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. परदेशातून ते उपचार घेऊन बरे होऊन भारतात परततात. त्यामुळे भारतातील अनेक रुग्णांमध्ये गैरसमज निर्माण होत होते; मात्र भारतातही आधुनिक व दर्जेदार उपचारपद्धती उपलब्ध आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारच्या विविध योजना उपलब्ध आहेत. त्याशिवाय सेवाभावी संस्थांच्या मदतीने कर्करोगावर उपचार करणे शक्‍य आहे, अशी माहिती टाटा स्मारक रुग्णालयाच्या रेडिओलॉजिस्ट डॉ. सरबानी लासकर यांनी ‘सकाळ’ दिली. ‘सकाळ’ २६ व्या वर्धापनदिनानिमित्त यंदाच्या वर्षी कर्करोगाबाबत जनजागृती करत आहे. ‘सकाळ’च्या या मोहिमेला ‘टाटा स्मारक रुग्णालया’नेही सहकार्याचा हात दिला आहे. त्यानिमित्त डॉ. सरबानी लासकर यांनी ‘सकाळ’ला दिलेली ही खास मुलाखत...

#HopeOfLife : कर्करोगावर भारतातच दर्जेदार उपचार  

sakal_logo
By
ऋषिराज तायडे

रेडिएशन उपचारपद्धती नेमकी कशी आहे. त्यातही टाटा रुग्णालयात आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. ते कोणते? 
- कर्करोगावरील प्रमुख तीन उपचारांच्या पद्धती म्हणजे शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशनचा वापर केला जातो. शस्त्रक्रिया आणि रेडिएशनमुळे ठराविक ठिकाणी परिणाम होतात. मात्र, केमोथेरपीमुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतात. रेडिएशनबाबत बोलायचे झाल्यास तोंडाचा कर्करोग झाल्यास त्यावर रेडिएशन करताना जिभेची चव जाणे, सातत्याने पाणी पिण्याची इच्छा होणे, त्वचा काळी पडणे आदी परिणाम होतात. पोटाच्या कर्करोगावर रेडिएशन केल्यास भूक मंदावणे, पोटात जळजळ होणे, शौच-लघुशंका करताना त्रास जाणवणे आदी परिणाम होतात. मात्र, आधुनिक उपचारपद्धतीमुळे त्याचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. रेडिओथेरेपी करण्यापूर्वी त्याबाबतचे नियोजन सीटी स्कॅनच्या पद्धतीनुसार केले जाते. त्यानुसार कर्करोगाच्या गाठीची इत्यंभूत माहिती घेऊन पुढील उपचाराची दिशा ठरवली जाते.

टाटा रुग्णालयात दाखल होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी जवळपास ७० टक्के रुग्णांवर रेडिओथेरपी करण्याची आवश्‍यकता असते. टाटा रुग्णालयात २०१९ साली आम्ही आठ हजार रुग्णांवर रेडिओथेरपी केली. त्यापैकी ७ हजार नवीन रुग्ण होते. दररोज टाटा रुग्णालयाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘इंटर्नल रेडिएशन’ उपचारपद्धती. त्याला ब्रेकीथेरपी असेही म्हणतात. यामध्ये कर्करोगाच्या गाठींवर आतून रेडिएशन दिले जाते. त्यामुळे इतर अवयवावर त्याचा परिणाम होत नाही. आम्ही दररोज ७-८ रुग्णांवर ब्रेकीथेरपी करतो. त्यातून वर्षभरात ९०० रुग्णांवर ब्रेकीथेरपी करण्यात आली. रेडिएशनसाठी आमच्याकडे १३ आधुनिक मशीन्स आहेत. त्यापैकी १० परळ रुग्णालयात, तर ३ खारघर रुग्णालयात आहेत. त्यातून आम्ही दररोज ४०० रुग्णांवर उपचार करतो.

#HopeOfLIfe : पतीपाठोपाठ पत्नीचीही कर्करोगाशी लढाई  


कर्करोग म्हणजे नेमके काय? कर्करोग होण्यास कोणते घटक कारणीभूत ठरतात?
- पेशींची अनियंत्रित वाढ हे कर्करोग होण्याचे महत्त्वाचे कारण असताना तंबाखू सेवनामुळे अनेक प्रकारचे कर्करोग होतात. जवळपास ८० टक्के कर्करोगांचा संबंध तंबाखूशी आहे. तंबाखूमध्ये वेगवेगळे १३०० विषारी घटक असतात. तंबाखूसेवन, मावा, धूम्रपान आदींमुळे तोंडाचा कर्करोग, गळ्याचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग, यकृताचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, मूत्राशयाचा कर्करोग होतो. बदलती जीवनशैली हे देखील कर्करोग होण्यामागील कारण आहे. आजकाल अनके जण मेहनतीची कामे कमी करतात. सर्व कामे बसून करण्यावर कल वाढत आहे. फास्टफूडचे सेवन, लठ्ठपणा, बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. शरीरातील हार्मोन्सचे कार्य बिघडल्याने स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. असुरक्षित लैंगिक संबंधातून एचपीव्हीमुळे (ह्यूमिनो पॉपिलो व्हायरस) गर्भाशयाचा कर्करोग, गुदायशयाचा कर्करोग, घशाचा कर्करोग होतो. मासिक पाळीवेळी पुरेशी स्वच्छता न राखल्याने गर्भशयाच्या मुखाचा कर्करोग होतो. भारतात बिहार, उत्तर प्रदेशमधील रुग्णांमध्ये पित्ताशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय काही अनुवांशिक कारणांमुळे स्तनाचा कर्करोग, गर्भशयाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग होतो. भारतात महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे.


आजकाल महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यामागे काय कारणे असू शकतात?
- बदलती जीवनशैली हे महिलांमधील कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाचे महत्त्वाचे कारण आहे. बदलती जीवनशैली म्हणजे केवळ व्यायामाचा अभाव, फास्टफूड खाणे, लठ्ठपणा नसून त्यामध्ये अनेक मुद्दे आहेत. स्पष्टपणे बोलायचे झाल्यास पूर्वी लवकर लग्न होऊन अनेक मुलंबाळं होत होती. त्यामुळे महिलांमधील हार्मोन्स कार्य सुरळीत पार पडायची. आता मात्र करियरमुळे अनेक जण उशिरा लग्न करतात. त्याशिवाय एकच अपत्य, तेही उशिरा जन्माला घालण्याकडे कल वाढत चालल्याने स्तनपान वेळेवर होत नाही. त्यामुळे महिलांमधील हार्मोन्सचे कार्य विस्कळित झाल्याने कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. 

#HopeOfLIfe : अशिक्षितांमध्ये कर्करोगाचे प्रमाण अधिक


अनेकदा कर्करोग तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात गेल्यावर लक्षात येतो. तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे कर्करोगाचे निदान लवकर होण्यासाठी काय केले पाहिजे ?
- कर्करोगाची लक्षणे आणि अन्य आजारांची लक्षणे जवळपास सारखीच आहेत; मात्र एखादा व्यक्ती धूम्रपान करत असेल किंवा तंबाखू सेवन करत असल्यास त्याच्या जिभेवर चट्टे दिसत असतील, घशात इन्फेक्‍शन वाटत असेल किंवा जेवताना त्रास जाणवत असेल आणि प्राथमिक उपचार घेतल्यावरही आराम पडत नसेल आणि काही तरी संशयित लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्‍टरांकडे जावे. महिलांमध्ये स्तनांमध्ये गाठ वाटत असेल, स्तनांचा आकार कमी-जास्त वाटत असेल, मासिक पाळी अनियमित असेल आणि यावर नियमित उपचार घेतल्यावरही लक्षणे दिसत असल्यास डॉक्‍टरांना दाखवावे. त्याशिवाय टाटा रुग्णालयांच्या वतीने अंगणवाडी सेविका, आशा महिलांना प्रशिक्षण देऊन लोकांना कर्करोगाची लक्षणे कशी ओळखावी, याबाबत प्रशिक्षण दिले जाते. टाटाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यासाठी प्रिव्हेन्टिव्ह ओन्कोलॉजी विभाग कार्यरत आहे. तसेच वेगवेगळ्या आरोग्य शिबिरांमध्ये कर्करोगाबाबत जनजागृती केली जाते.


अन्य कर्करोगाच्या तुलनेत हाडाचा, रक्ताच्या कर्करोगाची लक्षणे दिसून येत नाहीत. ती नेमकी कशी ओळखायची?
- हाडाचा किंवा रक्ताच्या कर्करोगाची लक्षणे लगेच लक्षात येत नाहीत. लहान मुलांमध्येही कर्करोगाची लक्षणे दिसून येत नाहीत. त्यासाठी प्रत्येक मुलाची तपासणी किंवा प्रत्येकाचा एक्‍स-रे काढणे उचित नाही. त्यामुळे लहान मुलांमध्ये अनेक दिवसांपासून ताप-सर्दी बरी होत नाही, शरीरात गाठ आल्याचे जाणवणे, वजन कमी होणे, रक्ताची तपासणी केल्यावर टायफॉईड-मलेरियाचे लक्षण नसतानाही काही घटकांची आकडेवारी संशयित वाटत असल्यास किंवा अन्य संशयित लक्षणे आढळल्यास कर्करोग तज्ज्ञाला दाखवले पाहिजे. त्याशिवाय अनेक जण वरीलप्रकारची लक्षणे आढळल्यास जनरल फिजिशियनकडे जातात. त्यामुळे त्या डॉक्‍टरांनाही कर्करोगाचे निदान करण्याबाबत प्रशिक्षण देण्याची गरज आहे. अन्ननलिकेच्या कर्करोगाच्याबाबतीत ॲसिडिटी औषधोपचार करूनही कोणताही फरक पडत नसल्यास तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली पाहिजे.


सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोगाचे निदान झाल्यास कोणते उपचार केले जातात?
- प्राथमिकतः कर्करोगाच्या दोन प्रकारच्या पेशी आढळतात. सॉलिड आणि लिक्विड ट्युमर. सॉलिड ट्युमर हा शरीरात गाठीच्या स्वरूपात आढळतो, तर लिक्विड ट्युमर रक्ताच्या कर्करोगामध्ये द्रव स्वरूपात आढळतो. प्राथमिक पातळीवर शस्त्रक्रिया आणि रेडिएशन करून त्यावरील उपचार केले जातात. मात्र, त्यासाठीही काही मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यात रुग्णाचे वय, शारीरिक क्षमता, आर्थिक क्षमता, कोणत्या उपचाराने रुग्ण लवकर बरा होईल, यानुसार उपचाराची निवड केली जाते. घशाचा कर्करोग असल्यास गळ्याची तपासणी करून त्यातील ग्रंथींची तपासणी केली जाते. रेडिओथेरपी, लेझर किंवा ट्रान्सरोबोटीक लेझर ट्रिटमेट केली जाते. अन्ननलिकेच्या कर्करोगाबाबत रेडिओथेरपी किंवा शस्त्रिक्रिया केली जाते. प्रत्येक रुग्णांवर उपचार करताना औषधोपचाराचे त्याच्यावर किमान साईडईफेक्‍टस होतील, याबाबत काळजी घेतली जाते. साईडईफेक्‍ट टाळण्यासाठी आणि रुग्णाला त्याचे पुढील आयुष्य विनासायास जगता आले पाहिजे, म्हणून रेडिएशन किंवा शस्त्रक्रिया करताना काळजी घेतली जाते. तंबाखूमुळे कर्करोग झाल्यावर गळ्यावर किंवा गालावर शस्त्रक्रिया केली जाते. तेव्हाही त्याला शस्त्रक्रिया केल्यावर भविष्यात त्रास होऊ नये म्हणून उपचार करताना काळजी घेतली जाते.


रुग्ण कर्करोगातून पूर्णपणे बरा झाल्यावर काय काळजी घ्यावी?
- कर्कगोगासारख्या गंभीर आजारातून रुग्ण बरा झाल्यावर त्याला उर्वरित आयुष्य निरोगी जगण्यासाठी काळजी घ्यावी लागतेच. तोंडाच्या कर्करोगातून रुग्ण बरा झाला की तंबाखू न खाणे, धूम्रपान न करणे, तोंडाची नियमित पाहणी करणे, आदी काळजी घेणे आवश्‍यक आहे. त्याशिवाय रुग्णालयातून सुटी मिळाल्यावरही नियमित आरोग्यतपासणी केली पाहिजे. आता बरे वाटत आहे, त्यामुळे डॉक्‍टरांकडे जाण्याची गरज नाही, असा विचार करणे चुकीचे आहे. कर्करोग टाळायचा असेल, तर सर्वच आपल्या हाती नाही; मात्र नियमित व्यायाम, उत्तम जीवनशैली, निरोगी आरोग्य जपले तर आजाराचा धोका आपण टाळू शकतो. प्रत्येक नागरिकाने वर्षातून एकदा संपूर्ण शरीराची आरोग्य तपासणी केली पाहिजे.

loading image