आज लॉकडाऊन 4.0 ची घोषणा होणार? कसा असेल 'चौथा' लॉकडाऊन  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

आज 17 मे... आज देशभरातला तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज चौथ्या टप्प्यातल्या लॉकडाऊनसंबंधी घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुंबई- आज 17 मे... आज देशभरातला तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज चौथ्या टप्प्यातल्या लॉकडाऊनसंबंधी घोषणा होण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन लॉकडाऊनपेक्षा तिसऱ्या लॉकडाऊनच्या टप्प्यात थोडाफार फरक होता. मात्र सोमवारपासून सुरु होणारा लॉकडाऊनही पूर्णतः वेगळा असेल असं  बोललं जात आहे. हा लॉकडाऊनही 15 दिवसांचा असणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज म्हणजेच रविवारी यासंदर्भातली घोषणा होऊ शकते. 11 राज्यांनी 18 मेपासून या नव्या लॉकडाऊनसंदर्भात विशेष योजना आखल्या आहेत. तसंच महाराष्ट्र राज्यानं गुरुवारी मुंबई महानगर, सोलापूर, पुणे, औरंगाबाद आणि मालेगावमध्ये 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची इच्छा व्यक्त केली. हे सर्व हॉटस्पॉट्स म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

केंद्रीय गृह मंत्रालय त्याबाबत निर्देश जाहीर करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. चौथा लॉकडाऊन हा आतापर्यंत जाहीर झालेल्या तिन्ही लॉकडाऊनपेक्षा वेगळा असेल, याचे संकेत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिले होते. या लॉकडाऊनचे स्वरूप हे वेगळे असणार आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठका घेतल्या.

हेच ठरू शकतं कारण कोरोनाच्या दुसऱ्या मोठ्या लाटेचं, धारावीतल्या 'हाय रिस्क' झोनमधले कामगारही...

या सुविधा मिळण्याची शक्यता

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात उद्योग सुरु करण्याबाबत आणखी सूट मिळण्याची शक्यता आहे. तसंच सार्वजनिक वाहतूक आणि कॅबलाही परवानगी मिळू शकते. नितीन गडकरी यांनीही याबाबतचे संकेत दिलेत. शाळा कॉलेजेस आणि इतर शैक्षणिक संस्था मात्र बंद ठेवण्यात येणार असल्याचं समजतंय. मॉल्स, हॉटेल्स आणि बाजारही बंदच राहतील. अत्यावश्यक सेवांना पूर्वीप्रमाणेच सूट देण्यात येईल.

लॉकडाऊन 4 चा नवा फॉर्म्युला

  • आर्थिक व्यवहार सुरळीत होण्याची शक्यता

लॉकडाऊनच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. रेड झोन असलेल्या जिल्ह्यात आतापर्यंत अत्यावश्यक दुकानं वगळता सर्वच व्यवहार ठप्प असायचे. परंतू आता रेड रेड म्हणून संपूर्ण जिल्ह्यातील व्यवहार ठप्प न करता, केवळ प्रतिबंधित क्षेत्रातील जनजीवनावरच त्याचा परिणाम होणारेय. असा निर्णय झाल्यास देशातल्या सर्वच राज्यातली आर्थिक स्थिती सुधारण्यास काही अंशी मदत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या काळात रेड झोन जिल्हे न राहता केवळ काही भाग रेड झोनमध्ये असेल, अशी शक्यता आहे.

Lockdown4.0 : चौथ्या लॉकडाऊनमध्ये होणार 'हे' मोठे बदल...

  • लांब पल्ल्याच्या रेल्वेही धावणार

तिसऱ्या लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या मजूर, कामगार, विद्यार्थ्यांसाठी सरकारनं विशेष व्यवस्था करुन ट्रेन, बसेसची सुविधा उपलब्ध करुन दिली. मजुरांना आपल्या स्वगावी सोडण्याचा निर्णय सरकारनं घेतला. लॉकडाऊनच्या पहिल्या दोन टप्प्यात रेल्वे वाहतूक पूर्णत ठप्प होती. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वेही धावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्र सरकार यावर विचार करत असून जरी रेल्वे सुरु केली तर त्याचे थांबे मात्र कमी करण्यात येतील, अशी शक्यता आहे.

how lockdown four is going to be announcement might happen today read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how lockdown four is going to be announcement might happen today read full story