esakal | डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय HRCT चाचणी करताय? आधी हे वाचा

बोलून बातमी शोधा

 HRCT
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय HRCT चाचणी करताय? आधी हे वाचा
sakal_logo
By
मिलींद तांबे

मुंबई : कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून अनेक जण HRCT चाचणी करत आहेत.या चाचणीच्या माध्यमातून प्रत्येकाला त्याचा HRCT स्कोर जाणून घ्यायचा आहे. परंतु, अनेक जण डॉक्टरांचा सल्ला न घेताच ही चाचणी करत आहे. मात्र, कोणत्याही सल्ल्याशिवाय ही चाचणी करणं धोकादायक ठरत आहे. विशेष म्हणजे या चाचणीची मर्यादा माहित नसल्यामुळे चाचणी करणाऱ्या नागरिकांमध्ये शारीरिक समस्या उद्धभवण्याची शक्यता अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.

कोरोना संक्रमणाचा धोका वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे HRCT (सीटी स्कॅन) केल्यावर आपल्या कोरोनाची लागण झाली आहे की नाही याची माहिती मिळते. त्यामुळे आपला HRCT चा स्कोर माहिती करून घेण्यासाठी तसेच लक्षणे नसलेले 15 ते 20 टक्के नागरिक स्वतःच्या मर्जीने ही तपासणी करत आहेत. एक स्कॅन हा 100 एक्सरेच्या समान असून स्कॅनिंग करण्याच्या मर्यादा असतात. मात्र, नागरिकांना याबद्दल माहिती नसल्याने अडचणी आणि धोके वाढत असल्याची माहिती टास्क फोर्सचे सदस्य आणि राज्य मृत्यू परीक्षण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.

हेही वाचा: कोरोनाची लक्षणं जाणवल्यास का करावी HRCT टेस्ट?

तसेच कोरोना झाला नसल्याचा आवेशात फिरणाऱ्या या नागरिकांपासून कोरोनाचा जास्त प्रसार होत असल्याचे डॉ. सुपे सांगतात.

कोरोनाची लक्षणे नसलेले, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेले व ऑक्सिजन लेव्हल सहित सर्व पँरामीटर योग्य असलेल्या नागरिकांनी HRCT करू नये. लक्षणे असताना तसेच लक्षणे असताना ऑक्सिजन लेव्हल कमी होणाऱ्यांनी 3 ते 5 दिवसात डॉक्टरांच्या सल्ल्याने HRCT करणे गरजेचे आहे.

"स्वतः एचआर सिटी करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण 15 ते 20 टक्के असून याच्या धोक्याबाबत नागरिकांना माहिती नाही. तर डॉक्टराच्या सल्ल्याने करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण 30 ते 35 टक्के आहे. मात्र डॉक्टरांनीही सरसकट HRCT करण्याचा सल्ला न देण्याचे आवाहन",डॉ. सुपे यांनी केले.

सीटी स्कॅन सेंटरवाल्यांवर पालिका नियम कठोर केले. याचे कारण की, HRCT स्कॅनमध्ये कोरोना संक्रमणाचा संशय असलेल्या लोकांची माहिती ते पालिकेला देत नाहीत. त्यामुळे हे संशयित आणि त्यांच्या संपर्कात येणारे लोक शोधण्यात पालिका असमर्थ ठरत आहेत आणि हेच लोक कोरोनाचा प्रसार करणारे म्हणून काम करीत आहेत. अंतर्गत सीटी स्कॅनमध्ये कोविडसाठी संशयित व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर घेणे बंधनकारक केले . या बरोबरच, त्या व्यक्तीची माहिती तातडीने स्थानिक आरोग्य विभागाला द्यावी. आणि त्यानंतर 2 तासांच्या आत त्याची आरटीपीसीआर किंवा अँटिजेन प्रतिजैविक चाचणी घेणे देखील बंधनकारक करणे गरजेचे झाले.

संपादन : शर्वरी जोशी