कोरोनाची विकेट घेत 'या' आजोबांनी रुग्णालयात साजरा केला 101 वा वाढदिवस, आजोबा म्हणतात..

कोरोनाची विकेट घेत 'या' आजोबांनी रुग्णालयात साजरा केला 101 वा वाढदिवस, आजोबा म्हणतात..

मुंबई : कोरोना संकटात अनेक बळी जात असताना एका कोरोनाबाधित आजोबांनी मात्र आपल्या आजारावर मात करत वयाचं शतक पूर्ण केलंय. इतकंच नाही तर उपचार घेत असलेल्या रुग्णालयातच त्यांनी आपला 101 वा वाढदिवस ही मोठ्या उत्साहात साजरा केला. "घाबरू नका,आत्मविश्वासाने कोरोनाला सामोरे जा, कोरोनावर मात करणे शक्य आहे", असा संदेश देत लोकांमधील कोरोनाची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.

अर्जुन गोविंद नारिंग्रेकर असे या आजोबांचे नाव आहे. नारिंग्रेकर आजोबांचा जन्‍म 15 जुलै 1920 रोजीचा. शतकपूर्ती होण्‍याच्‍या उंबरठ्यावर असतानाच आजोबांना कोरोनाने गाठले आणि‍ घरच्‍या सगळ्याच मंडळींच्‍या काळजाचा ठोका चुकला. आजोबांचा ‘पॉझिटिव्‍ह रिपोर्ट’ आल्‍यानंतर लगेचच 1 जुलै रोजी आजोबा महापालिकेच्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्‍णालयात दाखल झाले.

आजोबांचे वय लक्षात घेता, रुग्‍णालयातील डॉक्‍टरांनी व कर्मचा-यांनी आजोबांची व्‍यवस्थित काळजी घेतली. तर पूर्वाश्रमीचे शिक्षक असणा-या आजोबांनी देखील उपचारांना अतिशय चांगला प्रतिसाद देत कोरोनावर मात केली. उद्याच्‍या 15 जुलैला 101 व्‍या वर्षात पदार्पण करत असलेल्‍या आजोबांना आज रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्‍यात आला, तो त्‍यांचा शतकपूर्तीचा वाढदिवस साजरा करतच ! तर, कोरोनावर मात करणा-या या आजोबांनीही आपल्‍या खणखणीत आवाजात डॉक्‍टरांचे आणि कर्मचार-यांचे आभार मानत कांदिवलीतील आपल्‍या घराकडे कूच केली.

अर्जुन गोविंद नारिंग्रेकर हे मूळचे सिंधूदुर्ग जिल्‍हा होण्‍यापूर्वीच्‍या देवगड तालुक्‍यातील नारिंग्रे गावचे रहिवाशी आहेत. नारिंग्रेकर आजोबांनी मिठबांव, दहिबांव, विजयदुर्ग, कोळोशी, नारिंग्रे अशा विविध गावातील जिल्‍हा परिषद शाळांमध्‍ये शिक्षक म्‍हणून काम केले. 31 जुलै 1978 रोजी मुख्‍याध्‍यापक म्‍हणून निवृत्त झालेल्‍या आजोबांचे अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात कार्यरत आहेत. तर, सध्‍या आजोबा आपल्‍या मुलाकडे कांदिवली परिसरात राहतात. आजोबांच्‍या घरातील काही व्‍यक्तिंना कोरोनाची बाधा झाली आणि त्‍यानंतर आजोबांनाही कोरोनाची लक्षणे दिसू लागली. दवाखान्‍यात दाखल झाल्‍यानंतर आजोबांना न्‍युमोनिया देखील असल्‍याचे लक्षात आले आणि मग अतिदक्षता विभागात आजोबांवर उपचार सुरु झाले.

मुळातच शिक्षक असणा-या आजोबांचा खणखणीत आवाज आणि कडक शिस्तीचा अनुभव रुग्‍णालयातील डॉक्‍टरांनी आणि कर्मचार-यांनीही घेतला. जेवणाच्‍या आणि औषधाच्‍या वेळा काटेकोरपणे पाळणा-या आणि डॉक्‍टरांच्‍या सूचना लक्षपूर्वक ऐकून अंमलात आणणा-या आजोबांची कोरोनाशी सुरु असलेल्‍या लढ्यात सरशी झाली. आज आजोबांना डिस्‍चार्ज देण्‍यात आला तेव्‍हा रुग्‍णालयातील कर्मचा-यांनी आवर्जून केक आणून आजोबांचा शतकपूर्तीचा वाढदिवस साजरा करत आजोबांचे आशिर्वाद घेतले. तर नारिंग्रेकर आजोबांनीही रुग्‍णालयातील सर्वच डॉक्‍टर आणि कर्मचा-यांचे भरभरुन आभार मानले.

( संपादन - सुमित बागुल ) 

hundred years old man gets discharge from hospital celebrates 101 birthday at hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com