esakal | मुंबईकरांनो खबरदारी बाळगा, कोरोनानंतर 'या' संकटाचा सामना करा...
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांनो खबरदारी बाळगा, कोरोनानंतर 'या' संकटाचा सामना करा...

एकीकडे कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत असताना आणखी एक संकट समोर येऊन उभं ठाकलं आहे. अशातच मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा जास्त आहे आणि आता येत्या 3 दिवसांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

मुंबईकरांनो खबरदारी बाळगा, कोरोनानंतर 'या' संकटाचा सामना करा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


मुंबई- उद्या म्हणजेच तीन जूनच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार आहे. एकीकडे कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत असताना आणखी एक संकट समोर येऊन उभं ठाकलं आहे. अशातच मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा जास्त आहे आणि आता येत्या 3 दिवसांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

फक्त मुंबईसाठी येणार कोरोनाबाबतची नवी नियमावली? वाचा काय विचार आहे महापालिकेचा...

या वादळाचा सामना करण्यासाठी राज्याची आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, कोकण, पालघर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या भागात अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

मुंबईला फटका बसण्याची शक्यता 

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबत 12 ते 24 तासात चक्रीवादळची तीव्रता देखील वाढेल. त्यानंतर 3 जूनला रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि दमणदरम्यानच्या पट्ट्यात त्याचा जमिनीवर प्रवेश होईल. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळामुळे नुकसान होऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तवला.

पालिकेनं केल्या या उपाययोजना 

मुंबई महापालिकेनं क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत.  नागरिकांनी देखील आवश्यक ती खबरदारी आपल्या स्तरावर बाळगावी, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे. मुंबईतही तटरक्षक दल, नौदल, मुंबई अग्निशमन दल यांच्यासह राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके सुसज्ज करण्यात येत आहेत.

मुंबईतील मोठ्या औद्योगिक आस्थापना आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांनी आपली यंत्रणा आणि सामुग्री सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. तसंच मुंबईतील सर्व रुग्णालयांनी जनरेटर कार्यान्वित आहेत, याची दक्षता घेऊन वीजपुरवठा अखंड सुरू राहील, याची खातरजमा करुन घ्यावी, असे निर्देशही देण्यात आलेत.

भविष्यात राज्यातील जनतेच्या खिशाला कात्री लागणार;
खुद्द मंत्रिमहोदयांनीच दिली माहिती

पालघर जिल्ह्यात NDRFच्या तुकड्या तैनात 

पुढच्या काही दिवसात पालघर, ठाणे, मुंबई रत्नागिरी, रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात आज  NDRFच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. सध्या स्थानिक प्रशासनाच्या मदतीने समुद्र काठच्या ठिकाणांची पाहणी करण्यात येत असून तटरक्षक दल, मेरीटाईम बोर्ड प्रशासन सज्ज झालं आहे.

कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा 

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं चक्रीवादळाचा धोका असल्याने आता कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आता जिल्हा प्रशासनाकडून देखील काळजी घेतली जात आहे. ज्या बोटी अद्याप देखील समुद्रात आहेत त्यांना माघारी किनाऱ्यावर बोलवण्यात आले आहे. शिवाय, 26 जणांची एनडीआरएफ टीम दाखल झाली असून हे सर्वजण चिपळूण येथे कार्यरत आहेत. किनारी भागात सध्या सतर्क राहा असे आदेश देखील देण्यात आलेत. कोस्ट गार्ड देखील सध्या याबाबत काळजी घेताना दिसत आहे.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सवर चर्चा केली. यावेळी गृहमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना केंद्राकडून पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं. आणखी काही मदत लागल्यास ती देण्याची तयारी अमित शहा यांनी दाखवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

loading image
go to top