छातीत मारला बुक्का आणि सहा महिन्यांच्या गर्भवतीला पतीने ट्रेनमधून दिलं ढकलून

सकाळ वृत्तसेवा  
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

दहिसर ते मीरारोड या स्थानकादरम्यान संतापलेल्या पतीचं कृत्य

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील दहिसर ते मीरारोड या स्थानकादरम्यान संतापलेल्या पतीने गर्भवती पत्नीला धावत्या लोकलमधून बाहेर ढकलल्याची घटना समोर आली आहे. सागर धोडी (25) असे या आरोपी पतीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.  सुदैवाने ती महिला आणि तिच्या पोटातील बाळ दोघेही सुखरूप असल्याचे समजत आहे.  

15 नोव्हेंबर रोजी सागर आणि त्याची पत्नी राणी लोकलने नालासोपाऱ्याला जात होते. यावेळी त्यांच्यामध्ये काही कारणास्तव भांडण झाले. राग अनावरण न झाल्याने सागरने राणीला लोकलमधून बाहेर ढकलले. सुदैवाने राणी यामध्ये बचावली. यावेळी ट्रेनचा वेग कमी असल्यामुळे राणीला फारशी इजा झाली नाही तिच्या पायांना, उजव्या हाताला आणि डोळयांना मार लागला आहे.

राणीला तात्काळ रेल्वे पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पोटातील बाळ सुरक्षित असल्याचे सांगितले.  राणी ही सागरची दुसरी पत्नी असून  पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुले आहेत. सागरचं प्रेमप्रकरण समजल्यानंतर त्याची पत्नी मुलांना घेऊन घरातून बाहेर पडली. त्यानंतर एक नोव्हेंबरला सागरने राणीबरोबर दुसरे लग्न केले. लग्नावेळी राणी सहा महिन्यांची गर्भवती होती. मात्र, सागरला राणीपासून मुल नको होते. त्यामुळे तो तिच्याशी कायम वाद घालायचा. नेहमीच्या भांडणाला कंटाळून राणी आपल्या आईकडे राहण्यासाठी गेली होती.

त्यानंतर सागर 15 नोव्हेंबरला तिला भेटायला गेला. सागरने तिला त्याच्यासोबत मित्राकडे येण्यास सांगितलं. राणी तयार झाल्याने त्यांनी बोरीवलीहून विरार लोकल पकडली. राणी आणि सागर दरवाजाजवळ उभे असताना त्यांच्यात भांडण सुरु झाले. ट्रेनने दहीसर सोडल्यानंतर सागरने तिच्या छातीत बुक्का मारला व तिला बाहेर ढकलून दिले असे राणीने रेल्वे पोलिसांना सांगितले .

WebTitle : husband pushed six month pregnant wife from running train between dahisar to mira road


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband pushed six month pregnant wife from running train between dahisar to mira road