गृहनिर्माण संस्थांनी स्वच्छता दूत व्हावे - मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 डिसेंबर 2016

मुंबई - सर्व गृहनिर्माण संस्थांनी हरित आणि स्वच्छता दूत होत राष्ट्र आणि समाज सुधारण्याच्या कामात आपले योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. 

मुंबई - सर्व गृहनिर्माण संस्थांनी हरित आणि स्वच्छता दूत होत राष्ट्र आणि समाज सुधारण्याच्या कामात आपले योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. 

आयसीआयसीआय बॅंकेच्या स्वच्छ गृहनिर्माण सोसायटी पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. या वेळी आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्यासह इतर वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, की महापालिकांमार्फत बहुतांश कचरा संकलित केला जातो, त्याची वाहतूक केली जाते, विल्हेवाट लावली जाते. या सर्व प्रक्रियेमध्ये पर्यावरणामध्ये कार्बनची सातत्याने वाढ होत राहते. घनकचरा व्यवस्थापनाचे मोठे प्रकल्प हा यावर पर्याय नसून, गृहनिर्माण संस्थांमधून सुरू होणारे छोटे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी पुनर्वापर प्रक्रिया प्रकल्प, गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागांचे हरितीकरण, गृहनिर्माण संस्थांमधील अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर यासारखे छोट छोटे प्रकल्प हे अधिक उपयुक्त आहेत. 
पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान जाहीर केल्यानंतर 300 पैकी 100 शहरे स्वच्छ करण्यात सरकारला यश आले आहे. 29 हजार ग्रामपंचायतींपैकी आठ हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. बाकीची सर्व शहरे डिसेंबरपर्यंत तर सर्व ग्रामपंचायती डिसेंबर 2017 पर्यंत स्वच्छ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. 
 

पंतप्रधानांनी नोटाबंदीच्या माध्यमातून स्वच्छ समाज निर्मितीचे कामही हाती घेतले आहे. पाचशे कॅशलेश समाज निर्माण करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार झाल्यास भारताचे भविष्य आणखी उज्ज्वल होणार असून, देशाला "सुपर पॉवर' होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नसल्याचे प्रतिपादन फडणवीस यांनी या वेळी केले. 
 

आर्थिकच नाही तर सामाजिक विकासात आयसीआयसीआय बॅंकेने नेहमीच सहभाग नोंदवल्याचे सांगत चंदा कोचर म्हणाल्या, की पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान जाहीर केल्यानंतर आयसीआयसीआय बॅंकेने या कामात आपला सहभाग नोंदवत देशातील शहरांमध्ये अशी स्पर्धा आयोजित केली. सर्व गृहनिर्माण संस्थांनी स्वच्छतेच्या आणि इतर क्षेत्रांतील त्यांच्या कार्यात भविष्यातही सातत्य ठेवावे. 

Web Title: ICICI Bank's Clean Housing Society Award