Loksabha 2019 : पाणी नाही तर मतही नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

गोरेगाव येथील इराणीवाडीतील एसआरए प्रकल्पाच्या इमारतीत १२ वर्षांपासून पाणीच आलेले नाही. त्यामुळे ३०० हून अधिक कुटुंबांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

गोरेगाव, - येथील इराणीवाडीतील एसआरए प्रकल्पाच्या इमारतीत १२ वर्षांपासून पाणीच आलेले नाही. त्यामुळे ३०० हून अधिक कुटुंबांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतीत २००७ मध्ये झोपडीवासीयांचे पुनर्वसन झाले. या इमारतीला अद्याप ताबा प्रमाणपत्र मिळाले नसल्यामुळे महापालिकेकडून पाणीपुरवठा होत नाही, असा दावा रहिवाशांनी केला आहे. विकासकाकडून टॅंकरने होणारा पाणीपुरवठा अपुरा असल्यामुळे अनेक कुटुंबांना दररोज पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते. पाणी विकत घेणे परवडत नसलेले रहिवासी आजूबाजूच्या वस्त्यांमधून पाणी आणतात. 

या इमारतीमधील एकूण ३३३ सदनिकाधारकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यासाठी त्यांनी नगरसेवक, आमदार, खासदार, महापालिका आयुक्त, एसआरए प्राधिकरण व राज्य सरकारकडे अनेक वेळा तक्रारी केल्या; परंतु अद्याप पाणी समस्या सुटलेली नाही. त्यामुळे तेथील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या सोसायटीत १५०० ते १८०० मतदार आहेत. त्यापैकी बहुतेक जण मजूर, फेरीवाले, लहान व्यावसायिक आणि रोजंदारीवर काम करणारे आहेत.

पाण्याचा प्रश्‍न सोडवला नाही, तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही.
- राबिया शेख, रहिवासी

पाण्यासाठी काम सोडून घरी बसावे लागते. त्यामुळे आर्थिक प्रश्‍न निर्माण झाला आहे. पाणीटंचाईमुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
- जुबेर सय्यद, रहिवासी

Web Title: If no water No vote Election boycott