
मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून भाजपच्या अनेक नेते राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे युतीबाबत महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील या युतीबाबत भाष्य केलं आहे. नारायण राणे यांच्याघरी आज गणेशाचं आगमन झालं. यानिमित्त सकाळ माध्यम समुहाच्या सरकारनामा वेब पोर्टलशी बोलताना त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. (If Raj Thackeray river reaches sea of BJP Narayan Rane comment on BJP MNS alliance)
"ज्या विचारांनी महाराष्ट्र पुढे जाईल असे समविचार एकत्र येणार असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. मला वाटतं राज ठाकरे भाजपसोबत येत असतील तर समुद्रात राज ठाकरेंची नदी येऊन मिळाली तर त्याचं स्वागतच होईल. राज ठाकरे माझे मित्र आहेत ते सुज्ञ आहेत," अशा शब्दांत नारायण राणे यांनी भाजप-मनसे युतीवर भाष्य केलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री काळातील त्यांच्या कारभारावर राणेंनी सडकून टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीचं अॅनेलिसिस करण्यासारखं काहीही नाही. त्यांच्या कार्यकाळात राज्यातील जनतेचं दरडोई उत्पन्न वाढलं नाही की राज्याचा जीडीपी वाढला. ना राज्यात इंडस्ट्री वाढली, ना उत्पादन वाढलं. ना शेतकऱ्यांना न्याय मिळाला, ना मराठी माणसांना नोकऱ्या मिळू शकल्या. काहीच झालेलं नाही. असा निष्क्रीय मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही झाला नाही.
अडीच वर्षात शिवसैनिकांना काहीही मिळालं नाही - राणे
अडीच वर्षात तीन तास ना मंत्रालयात, ना कॅबिनेटमध्ये, ना सभागृहात मातोश्री सोडून हा मुख्यमंत्री कुठेही गेला नाही. काय बढाया मारतोस गप्प बस ना. बाळासाहेबांना ही शिवसेना घडवायला ४८ वर्षे लागली. या माणसानं अडीच वर्षात शिवसेना संपवून टाकली. या अडीच वर्षात कोणाचाच विकास झाला नाही. शिवसैनिकांनाही काही मिळालं नाही, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.