Ganeshotsav 2022: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणपती आणि प्राजक्ता...हार्ट टू हार्ट कनेक्शन}

मी कुठलाही नवीन प्रोजेक्ट करते,शूटिंगचा पहिला दिवस असेल,अगदी कोणतीही चांगली गोष्ट करायला मी जाते, तेव्हा तेव्हा माझी पावलं पुण्यातील सारस बागेतील गणेशाचं दर्शन घ्यायला वळतात.

'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

'माझं मन इतकं चंचल आहे,त्याला स्थैर्यच मिळत नाही. आता इकडे,तर क्षणात दुसरीकडे ते धावतं. माझ्या भोवती मोहमाया इतकी आहे की ते मन उंदराप्रमाणे धावतंय. तर तू त्याच्यावर बैस म्हणजे त्याला स्थिरता येईल'… असं आहे गणपतीशी प्राजक्ताचं हार्ट टू हार्ट कनेक्शन...

प्राजक्ता माळीसाठी गणपती म्हणजे ऊर्जा, संघर्षाच्या घावावरची हळुवार फुंकर, हार्ट टू हार्ट कनेक्शन...पण प्राजक्ताला आजचं बदलेलं गणेशोत्सवाचं स्वरुप काही कारणांनी खटकतं. गणेशोत्सवाच्या नावाखाली सुरु असलेला चुकीच्या गोष्टींचा अतिरेक तिला टोचतो. याविषयी आपली काही स्पष्ट मतं मांडताना प्राजक्तानंआजच्या बदललेल्या गणेशोत्सवाच्या स्वरुपावर थेट भाष्य केलं आहे. (Marathi Actress Prajakta Mali Talks About Ganpati Festival)

गणेशोत्सवातूनच झाली कलाक्षेत्रात एन्ट्री

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या कलाक्षेत्रातलं चर्चेतलं नाव. आज मोठमोठ्या पुरस्कार सोहळ्यात हजारो प्रेक्षकांसमोर सहज परफॉर्मन्स देऊन मन जिंकणारी प्राजक्ता या सगळ्याचं श्रेय देते गणेशोत्सव सणाला.

ती म्हणते,.....याच गणेशोत्सवात (Ganeshostava) आयोजित केलेल्या कार्यक्रमात मी माझा पहिला परफॉर्मन्स दिला होता. तेव्हा गणेशोत्सवाच्या दरम्यान ज्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या त्यात मी हिरिरीनं भाग घ्यायचे. मला जेव्हापासून कळू लागलंय,तेव्हापासून मला आठवतंय की माझा असा एकही गणेशोत्सव गेला नाही ज्यामध्ये मी स्पर्धेत भाग घेतला नाही. कधी नृत्य तर कधी एखाद्या छोटेखानी कार्यक्रमातून परफॉर्मन्स मी सादर करायचेच.

माझ्यात आज जो आत्मविश्वास आहे, गणेशोत्सव काळातल्या स्पर्धांमध्ये भाग घेऊनच आला आहे. प्रेक्षकांसमोर नृत्य (Dance) करायची, बिनधास्त परफॉर्मन्स द्यायची भीड चेपली गेली, ती या गणेशोत्सवादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमातूनच. त्याअर्थानं गणेशोत्सव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी अशाच गणेशोत्सवातील कार्यक्रमातून घडले असं मला वाटतं. त्यामुळे आता माझ्यासमोर २५ हजार लोक असोत की ५० हजार मला भीती मुळीच वाटत नाही. आणि या अर्थानं गणेशोत्सवाचं महत्त्व माझ्या लेखी खूप मोठं आहे. माझं पहिलं गणेशोत्सवात परफॉर्म केलेलं गाणं मला आजही आठवतं......सारेगमप मपधनीसा...

संघर्षाचे घाव भरुन काढणारी ऊर्जा म्हणजे गणपती

गणपती (Ganapati) माझ्यासाठी एक अशी ऊर्जा आहे जी मला नेहमीच संघर्षाच्या प्रसंगी उभं राहण्याचं बळ देते. अर्थात इथे मी हे नक्कीच सांगेन की माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग आले तेव्हा-तेव्हा मी शीवाचा धावा केला पण गणेशानं त्या संघर्षाच्या घावांमधून बाहेर येण्याचं बळ मला नेहमीच दिलं. मी कुठलाही नवीन प्रोजेक्ट करते,शूटिंगचा पहिला दिवस असेल,अगदी कोणतीही चांगली गोष्ट करायला मी जाते, तेव्हा तेव्हा माझी पावलं पुण्यातील सारस बागेतील गणेशाचं दर्शन घ्यायला वळतात. आणि अथर्वशीर्ष पठण हे नेमानं होतंच त्या क्षणी.

गेल्या अनेक वर्षापासून हे मी सातत्यानं करते आहे, नव्हे ती उर्जाच माझ्याकडून ते करवून घेते. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मी पुण्यात मानाच्या पाच गणपतीचं दर्शन घेते आणि यात कधीच खंड पडलेला नाही. जर मी भारतात नसेन कुठल्या साली, तेव्हाच ते दर्शन चुकलं असेल. मी असे काही धागेदोरे बांधूनच ठेवले आहेत. कारण अथर्वशीर्ष पठणामध्येच आहे ,'तूच शिवा,तूच चंद्र, तूच देवी आहेस..तूच सगळं आहेस. तू निराकार,तू निर्गूण'. त्यामुळे एक अशी ऊर्जा आहे जी कायम मला गणेशाशी बांधून ठेवते.

पुण्यातील गणेशोत्सवाचं मनावर गारुड

पुण्यातला गणेशोत्सव म्हणजे मी अनुभवलाय एक भव्य-दिव्य सोहळा. इथल्या गणेशोत्सवातील देखाव्यांपासून ते ढोल-ताशा (Dhol-Tasha) पथकापर्यंत, ते अगदी नृत्य स्पर्धा, परफॉर्मन्सेसपासून ते पुणे फेस्टिव्हलपर्यंत साऱ्यांचीच पुण्यात मी रेलचेल अनुभवली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुण्यात कलाकारांना या गणशोत्सव मिळणारी संधी आणि व्यासपीठ, अशा सगळ्याच बाबतीतच पुण्यातील गणेशोत्सव (Pune Ganesh Festival) मोठी भूमिका बजावतो. त्यामुळे माझ्या मनावर लहानपणापासून पुण्यातील गणेशोत्सवाचं गारुड आहे. मला तर लहानपणी वाटायचं दिवाळीपेक्षाही (Diwali) मोठा सण,किंबहुना सगळ्यात मोठा सण गणेशोत्सवच आहे. नंतर जेव्हा हळूहळू कळायला लागलं तेव्हा मग प्रत्येक सणाचं आपलं असं एक वैशिष्ट्य असतं हे समजलं.

गणेशोत्सवातील अतिरेक खटकतो...

प्राजक्तानं ज्या पद्धतीनं स्वतः अनुभवलेल्या गणशोत्सवाचं स्वरुप सांगितलं तेवढंच गणेशोत्सवात होणारा अतिरेक अजिबात स्वागतार्ह नाही हे स्पष्टच बोलून दाखवलं. याबाबत ती म्हणते......

एका रस्त्यावर चार-चार मंडळं,मोठ-मोठाले मंडप बांधून अडवलेले रस्ते हे मला मुळीच पटत नाही. अगदी पाठीला पाठ लावूनही गणेशोत्सव मंडळं आहेत. आणि त्यामुळे लाऊडस्पीकरवर वाजणाऱ्या गाण्यांनी ध्वनीप्रदूषणाचा जो काय भडीमार सुरू असतो, त्यानं डोकं फक्त फुटायचं बाकी असतं. आणि मला वाटतं गणेशोत्सव सुरू करताना लोकमान्य टिळकांचा नक्कीच हा विचार नव्हता. सार्वजनिक गणेशोत्सवाचा अर्थच होता की सगळ्या समाजानं एकत्र यावं आणि आता आपण अनेकदा पाहतो गणेशोत्सव मंडळात आपापसात फूट पडते, उत्सवाला व्यावसायिक स्वरुप आल्यानं भक्तीला नाही त्या माध्यमातून येणाऱ्या पैशाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. त्यामुळे या उत्सवातून जे साध्य करण्याचा उद्देश होता तो कुठेतरी मागे पडत चालला आहे.

'एक गाव,एक गणपती'..

मला वाटंत एक गाव,एक गणपती ही संकल्पना जशी काही गावं राबवत आहेत, त्यावर नक्कीच सर्व गणेश मंडळांनी विचार करायला हवा. आणि मला खरंच या संकल्पनेचं खूप कौतूक वाटतं. काही मंडळं अशी आहेत की जे खरंच डीजे वाजवत नाहीत,अगदी शांततेत गणेशोत्सव साजरा करतात. सामाजिक संदेश अनेक मंडळं देखाव्यातून देतात. अगदी मी पाहिलंय की काही मंडळं पारंपरिक वाद्यांचा वापर करून फक्त ढोल-ताशे अशी पारंपरिक वादन संस्कृती आजही जागृत ठेवून आहेत.

काही मंडळं आजही आपल्या मुळांशी जोडलेले आहेत, त्यांना खरंच हॅट्सऑफ. पण दुसरीकडे जेव्हा डीजे बडवत,नाचगाण्यांच्या धिंगाण्यात दारु पिऊन होणाऱ्या मिरवणूका रात्री-रात्री पर्यंत चालतात, त्यांनी नुसता गणेशोत्सवादरम्यान जो काही उच्छाद मांडलेला असतो ते खंरच खूप चुकीचं वाटतं. यावर सर्वच गणेश मंडळांनी विचार करुन गणेशोत्सवाचं मूळ उद्दिष्ट लक्षात घेऊन सण साजरा करायला हवा.

गणेशोत्सवात नो डाएट मंत्र...

मी तशी खूप खादाड आहे. अर्थात या काळात नो डाएट मंत्र मी हटकून जपते. मला मोदक खूप आवडतात,मग काय फक्त ३-४ नाही अगदी आडवा हात मारते मी मोदकांवर. ते ही अगदी तो मोदक फोडून,त्यात चांगलं तूप घालून मी ते खाते. माझी आई तळलेले मोदक खूप सुंदर बनवते. तसंच, बाहरेचं म्हणाल तर पुण्याच्या एका मोठ्या मिठाईवाल्यांकडे मिळणारे उकडीचे मोदक माझे प्राणप्रिय. मी ते कितीही खाऊ शकते. मला मोदक बनवता येत नसले तरी ते बनवताना पडेल ती मदत आईला करण्यात मी कायम अग्रस्थानी असते. थोडक्यात मी हेल्परची भूमिका बजावते.

गणपतीशी असे कनेक्ट व्हा...

मी भरतनाट्य शिकले आहे. त्यात आम्हाला एक रचना शिकवली आहे. ज्याच्यात गणेशाला आवाहन करायला शिकवतात. ते असं की, 'माझं मन इतकं चंचल आहे,त्याला स्थैर्यच मिळत नाही. आता इकडे,तर क्षणात दुसरीकडे ते धावतं. माझ्या भोवती मोहमाया इतकी आहे की ते मन उंदराप्रमाणे धावतंय. तर तू त्याच्यावर बैस म्हणजे त्याला स्थिरता येईल'. गणपती विषयी जे काही सांगितलं आहे ते सारं मनाला भावतं माझ्या. मी पटकन कनेक्ट होते. दुसरं आपण जर पाहिलं तर गणपतीचं पोट इतकं मोठं आहे की,सांगितलं जातं तो आपली सगळी दुःख,संकटं गिळून टाकतो म्हणून त्याचं पोट इतकं मोठं आहे. मग आपण स्वतःच्या चूका,इतरांच्या चुका गिळून टाकाव्यात,डोक्यात ठेवू नयेत. गणपतीच्या कानांचा देखील एक अर्थ आहे आज सगळ्यांचा प्रॉब्लेम हा आहे की कुणाला कोणाचं ऐकायचं नसतं. पण जेव्हा तुम्ही इतरांचे ऐकाल तेव्हाच काहीतरी सांगण्याच्या पातळीचे व्हाल. आपली श्रवणशक्ती खूप कमी झालीय. आपण हल्ली खूप कमी ऐकतो, फक्त बोलायचं असतं आपल्याला.

(शब्दांकन - प्रणाली मोरे)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”