Ganesh Festival: काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड}
जाणून घ्या बाप्पांविषयी बरेच काही....

धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

‘गं’ म्हणत असताना मधल्या अकाराला दिलेल्या वेळेदरम्यान अंतरजिव्हा म्हणजे पडजीभ वरचा मार्ग बंद करते, जेणेकरून मेंदूजलामध्ये एक प्रकारचा दाब उत्पन्न होतो, ज्यामुळे मेंदूतील दोष दूर होतात त्यामुळेच ‘गं गणपतये’ मंत्राच्या उच्चाराने सर्व पापांची निवृत्ती होते ...वाचा श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांचे विवेचन

श्रीगणेशाच्या (Shree ganesh) दहा दिवसाच्या उपासनेचा, उत्सवाचा आज पहिला दिवस. कार्यारंभी स्मरण केले जाणारे ते श्रीगणेश.... सध्याच्या कलियुगात प्रमुख दैवत मानले जाणारे ते श्रीगणेश,... शरीरातील पहिल्या चक्राच्या - मूलाधाराच्या ठिकाणी स्थित असणारे ते श्रीगणेश आणि सर्व विश्र्वाची उत्पत्ती ज्या नादातून झाली त्या ॐकाराचे स्वरूप म्हणजेही श्रीगणेश. (Secrets of Lord Ganesha described by Sri Guru Balaji Tambe)

ज्ञानेश्र्वर माउलींनी गणपतीची प्रार्थना करताना म्हटले आहे.....

अकार चरण युगुल, उकार उदर विशाल ।

मकार महामंडळ, मस्तकाकारे ।।

वेदांमध्ये गणपतीला ‘ब्रह्मणस्पती’ नावाने संबोधलेले आहे. शिव, दुर्गा, ब्रह्मा आदी देवतांच्या श्रेणीतील एक देवता आहे, ब्रह्मणस्पती-गणपती. वाणी व संवादाचे अधिष्ठान असलेल्या या देवतेच्या पूजनाने तैलबुद्धी, निर्णयक्षमता आणि न्यायबुद्धीची प्राप्ती होते. श्रीगणेशाच्या वेगवेगळ्या नावांवरूनच त्याच्या वेगवेगळ्या क्षमतांची, शक्तींची माहिती मिळते.

उच्च कोटीची ग्रहणशक्ती आणि वेगवान लेखनकौशल्य असणारा, लेखणी तुटली असता लिहिण्यात खंड पडू नये म्हणून स्वतःचा दात उपटून त्याची लेखणी करणारा तो एकदंत; सर्व प्रकारच्या सिद्धी, शक्ती व संपदेचा कारक असणारा तो सिद्धिविनायक; सर्व विघ्न, दुःख दूर करणारा तो विघ्नेश्र्वर; सर्व गणांचा नेता (मास लिडर) आणि सर्व नकारात्मक शक्तींवर नियंत्रण ठेवणारा तो गणपती; पृथ्वीतत्त्व व मंगळग्रहावर प्रभाव असणारा तो अंगारक; संवादासाठी, विचारांना शब्दरूप देण्यासाठी ज्याची उपासना करावी तो वाचस्पती.

श्रीगणेशांच्या आराधनेने शक्तीच्या विविध रूपांचे आकलन अधिक सहजपणे होऊ शकते. म्हणून विश्र्वाच्या आरंभापासून श्रीगणेश विद्यमान आहेत. अनादीकाळापासून श्रीगणेशांचे जगभरात पूजन होत आले आहे. आजही जगभरात श्रीगणेशांची मंदिरे आणि मूर्ती पाहायला मिळतात. श्रीगणेशाची उपासना नादाच्या माध्यमातून सोप्या रीतीने करता येते. नादाची स्पंदने प्रत्येक वस्तुमात्रावर व सर्व शक्तिकेंद्रांवर प्रक्षेपित होतात.

मूलाधार चक्राच्या ठिकाणी असलेल्या श्रीगणेशाला प्रसन्न करायलाही नादच उपयोगी पडतो. श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी गणेशसंकल्पनेचे म्हणजेच गणेशविद्येचे ज्ञान अथर्वशीर्षात दिलेले आहे. त्यात गणेशविद्या म्हणजेच नादविद्या असे सांगितलेले आहे. ज्या नादातून सर्व विश्र्वाची व त्यातील शक्तींची तसेच नाना तऱ्हेच्या स्पंदनांची, अक्षरांची व वर्णाची उत्पत्ती झाली ती गणेशविद्या याप्रमाणे समजावलेली आहे.....

‘गकारः पूर्वरूपम्‌ अकारो मध्यमरूपम्‌ अनुस्वारश्र्चान्त्यरूपम्‌ बिन्दुरुत्तररूपम्‌ नादः सन्धानम्‌’ । संहिता सन्धिः । सैषा गणेशविद्या ।

‘ॐ गँ’....हा गणपतीचा बीजमंत्र. हा उच्चारताना त्याचे पूर्वरूप ‘ग’, मध्यमरूप ‘म’ आणि अंतिमरूप ‘अनुस्वार’ आहे. या सर्वांचा एकसमयावच्छेदेकरून उच्चार केल्यावर निर्माण होणाऱ्या नादाला आकाशातून मिळणारी साद म्हणजे त्याचे ‘बिंदुरूप’. असा शून्य ते अनंत यांना समावून घेणारा उच्चार करण्याने आणि त्याची सुरुवात ॐकाराने करण्याने, ॐ या ध्वनीची आस धरून पूर्ण मंत्र म्हणण्याने श्रीगणेशाची उपासना करता येते.

‘गं’ चा उच्चार ‘गम्‌’ असा केला तर दुःख असा हिंदीतील अर्थ होईल. ग वरील अनुस्वाराचा उच्चार कसा करावा हे कळावे म्हणून पुढे ‘गणपतये नमः’ असे शब्द टाकले. कारण अनुस्वाराच्या पुढे ‘ग’ आल्याने त्याचा उच्चार ‘ङ्’ असा करायचा असतो. तेव्हा आधी अर्धा ‘ग्’, नंतर स्वराचे भान होईल इतपत ऱ्हस्व मात्रेचा ‘अ’ व शेवटी ‘ङ्’ अशा प्रकारे ग्-अ-ङ् अशा पद्धतीने ‘गँ’ चे उच्चारण करायला हवे. यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अर्धचंद्राचा उच्चार. हा नाद उचलून मस्तकामध्ये उचलून घेऊन जायचा आणि संपूर्ण मस्तकात घुमवायाचा. ‘ग’ वर्णाला ‘ङ्’ लावून बरोबरीने अर्धचंद्रासकट म्हणजे ‘गँ गणपतये नमः’ अशा प्रकारे मंत्र म्हणण्याने गणेश उपासना करता येते.

मेंदूमध्ये साठलेल्या विकृती, मग त्या भौतिक असोत वा वैचारिक असोत, मेंदूत असलेल्या मेंदूजलातील दोष दूर करण्यासाठी आतमध्ये पोचवायची स्पंदने या ‘गं’ च्या उच्चाराने सहज पोचतात. ‘गं’ म्हणत असताना मधल्या अकाराला दिलेल्या वेळेदरम्यान अंतरजिव्हा म्हणजे पडजीभ वरचा मार्ग बंद करते, जेणेकरून मेंदूजलामध्ये एक प्रकारचा दाब उत्पन्न होतो, ज्यामुळे मेंदूतील दोष दूर होतात त्यामुळेच ‘गं गणपतये’ मंत्राच्या उच्चाराने सर्व पापांची निवृत्ती होते असे म्हटले.

मेंदू मनुष्याच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारे सर्वांत मोठे साधन होय. मेंदूच्या ओळखीवरच आपल्याला व्यक्तीची ओळख समजते. मेंदू निर्णय घेण्याच्या क्षमतेवर काम करत असतो. गणपतीच्या बाबतीत एक गोष्ट सांगितली जाते. जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा आधी करेल त्याला बक्षीस मिळेल अशी शिव-पार्वतीने अट घातली असता कार्तिकस्वामी जलद गतीने आपल्या वाहनावर बसून पृथ्वीप्रदक्षिणा करायला निघाले तर स्वतःच्या माता-पित्याला प्रदक्षिणा घालून कार्य आधी पूर्ण केल्यामुळे श्रीगणेश बक्षीसपात्र ठरले. यावरून गणपतीच्या बुद्धीची गतिमानता दिसून येते. त्यामुळे गणेश देवता गती व निर्णय घेण्याची क्षमता असलेली बुद्धी या दोन गोष्टींची देवता ठरते. हे सर्व लाभ आपल्याला व्हावेत, बुद्धी, प्रज्ञा अलौकिक व्हावी यासाठी गणेश उपासना करायची असते.

ज्ञानदेव माऊलींनी गणपतीचे रूप नुसत्या नादात वा शब्दात नव्हे तर संपूर्ण वाङ्मयमूर्तीच्या रूपातच पाहिलेले आहे. गणपतीचा अत्यंत निर्मळ सुविचार म्हणजे गणपतीची सोंड, त्याच्या ज्ञानाचे स्फुरण म्हणजे त्याचे छोटे पण तीक्ष्ण दृष्टी असलेले बारीक डोळे; कुठल्याही गोष्टीला तर्कशुद्ध निर्णय आवश्यक आहे हे सूचित करण्यासाठी आशीर्वाद देणारा त्याचा वरदहस्त; सर्व काही व्यवस्थित व नैसर्गिक होईल असे सांगणारा त्याचा अभयहस्त; श्रीगणपतीच्या मुकुटावर वाहिलेली फुले व रत्ने म्हणजे उपनिषदे, जी संपूर्ण वाङ्मयाची शोभा वाढवितात; अशा तऱ्हेने ॐकाराने दशदिशांना जे वाङ्मयविश्र्व व्यापलेले आहे, तसे गणपतीचे रूप ज्ञानेश्र्वरांनी वर्णन केलेले आहे.

प्रत्येक मंत्राला एक देवता असावी लागते. तो मंत्र म्हणजे त्या देवतेची मंत्रशक्ती असते, जणू देवतेशी संपर्क करण्यासाठीचा पासवर्ड असतो. म्हणजे ‘गँ गणपतये नमः’ या मंत्राची देवता श्रीगणेश आहे. आणि ‘गँ गणपतये नमः’ हा मंत्र श्रीगणेशाची उपासना करण्याचा पासवर्ड आहे. ‘गँ’ चा उच्चार नादात्मक पद्धतीने करणे ही गणेशविद्येतील कला आणि विज्ञान आहे. कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी, विज्ञानाचे गूढ उकलून सांगण्यासाठी संस्कारांची पर्यायाने सद्‌गुरुंची आवश्यकता असते.

गणेशोपासना म्हणजेच मेंदूची उपासना. प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूमध्ये गणेशदेवता श्रीमहागणपती या रूपाने राहतो व त्याची उपासना करणाऱ्या व्यक्तीचे कल्याण नक्कीच होते. पार्थिव गणेशाच्या पूजन-अर्चनासाठी भाद्रपदात योजलेल्या या दहा दिवसांच्या विशेष उत्सवाच्या निमित्ताने सर्वांना गणेशोपासनेची प्रेरणा मिळो हीच श्रीगणेशचरणी प्रार्थना.

१. ‘ग’ वर्णाला ‘ङ्’ लावून बरोबरीने अर्धचंद्रासकट म्हणजे ‘गँ गणपतये नमः’ अशा प्रकारे मंत्र म्हणण्याने गणेश उपासना करता येते.

२. शरीरातील पहिल्या चक्राच्या - मूलाधाराच्या ठिकाणी स्थित असणारे ते श्रीगणेश आणि सर्व विश्र्वाची उत्पत्ती ज्या नादातून झाली त्या ॐकाराचे स्वरूप म्हणजेही श्रीगणेश.

३. मेंदूमध्ये साठलेल्या विकृती, मग त्या भौतिक असोत वा वैचारिक असोत, मेंदूत असलेल्या मेंदूजलातील दोष दूर करण्यासाठी आतमध्ये पोचवायची स्पंदने या ‘गं’ च्या उच्चाराने सहज पोचतात.

४. त्यामुळे गणेश देवता गती व निर्णय घेण्याची क्षमता असलेली बुद्धी या दोन गोष्टींची देवता आहे.