भाजपची मते राष्ट्रवादीला गेल्यास तटकरेंचा विजय निश्चित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

दोन्ही पक्षांच्या मतांची संख्या पाहता पनवेलमधील मतांच्या जोरावर विधान परिषदेची निवडणुक जिंकणे सहज शक्य असल्याचे गणित तटकरेंना माहीती असल्याने निवडणुकीच्या दिवशी ते पनवेलमध्येच तळ ठोकून बसले होते. पनवेल उरणमध्ये सर्व पक्षांचे मिळुण एकूण ११८ मतदार असून, सेना वगळता उर्वरीत सर्व मते राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. 

पनवेल : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेकरिता पार पडलेल्या निवडणुकी दरम्यान पनवेल मधील भाजपचे आमदार आणि नगरसेवक उघडपणे राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरेंच्या सोबत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारा करिता हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. पनवेल मध्ये भाजपचे 54 नगरसेवक निवडुण आले असुन, उरणमधील भाजपची मते आपल्या पदरात पाडण्यात तटकरेंना यश आल्याचे मानले जात आहे.  असे घडल्यास अनिकेत तटकरेंचा विजय निश्चित मानला जात आहे.
या बाबत आमदार प्रशांत ठाकुर यांच्याशी संपर्क साधला असता ठाकुर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शवला. 
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुक सोमवारी (ता.21) पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडुन सुनील तटकरेंचे सुपुत्र अनिकेत तटकरे निवडणुक लढवत आहेत. तर शिवसेनेकडुन राजीव साबळे हे उमेदवार आहेत. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ९४१ मतदारांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क आहे. शिवसेना व भाजप यांची कोकणात एकूण ४२२ सदस्य संख्या आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, स्वाभिमान पक्ष व मनसे यांची एकूण मतांची संख्या ४१२ होत आहे. तर अपक्ष सदस्य २३ असून ही मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे राज्यात भाजपा-सेना एकत्र असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने सेनेला हा मोठा झटका मानला जात आहे. 

पालघर लोकसभा निवडणुकीत सेनेने वनगा कुटुंबीयांचा पक्ष प्रवेश करून त्यांच्या मुलाला उमेदवारी दिल्याने भाजपामध्ये नाराजी पसरली होती. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेत सेना-भाजप यांची अघोषित युती झाली होती. मात्र शेवटच्या क्षणी भाजपाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने सेनेला मोठा झटका बसला आहे. 

दोन्ही पक्षांच्या मतांची संख्या पाहता पनवेलमधील मतांच्या जोरावर विधान परिषदेची निवडणुक जिंकणे सहज शक्य असल्याचे गणित तटकरेंना माहीती असल्याने निवडणुकीच्या दिवशी ते पनवेलमध्येच तळ ठोकून बसले होते. पनवेल उरणमध्ये सर्व पक्षांचे मिळुण एकूण ११८ मतदार असून, सेना वगळता उर्वरीत सर्व मते राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. 

माध्यमांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देवु नये असे निर्देश आहेत. म्हणुन याविषयी प्रतिक्रिया देणार नाही. मतदान केंद्रावर गेलो असता तटकरेही तिथेच उपस्थित असल्याने दोघांची भेट झाली. - प्रशांत ठाकुर,आमदार,पनवेल.

Web Title: if votes of the BJP shift to NCP, the victory of tatkare is certain