साफसफाईकडे पालिकेचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

शाहू नगर व आझाद नगरमधील नाल्याची लवकरच साफसफाई करण्यात येईल. साफसफाईनंतर संरक्षक भिंतीचे काम करण्यात येणार आहे. 
- रमाकांत बिराजदार, सहायक आयुक्त, जी-उत्तर विभाग.

दादर - एप्रिल संपून मे महिना सुरू झाला तरी दादरमधील शाहू नगर येथील मुख्य नाल्याची अद्याप साफसफाई करण्यात आली नाही. त्यामुळे नालेसफाई वेळेत न झाल्यास पावसाळ्यात नाल्याशेजारी असलेल्या झोपड्यांमध्ये पाणी भरण्याची शक्‍यता आहे. त्याचप्रमाणे या नाल्याच्या दोन्ही बाजूंना असलेली संरक्षक भिंत कोसळली असल्याने रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. लहान मुले या नाल्याच्या आसपास खेळत असल्याने ते कधीही नाल्यात पडण्याची भीती निर्माण झाली आहे. 

शाहू नगरमधील नाला हा मुंबईतील मुख्य नाल्यांपैकी एक समजला जातो. हा नाला तुडुंब भरला असून, त्यात जमा झालेल्या कचऱ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. दर वर्षी या नाल्याच्या सफाईकडे पालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने पावसाळ्यात अनेकदा घरांमध्ये पाणी शिरत असल्याची तक्रार येथील रहिवासी जायदा शेख यांनी मांडली. या नाल्याला जोडणारा आझाद नगर येथील डी वॉर्ड नालाही कचऱ्याने तुडुंब भरला आहे. यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पडलेला असल्याने नाल्यातून पाणी वाहून जात नाही. 

या नाल्याच्या दोन्ही बाजूंना असलेली संरक्षक भिंतच तुटली असून, ही भिंत अद्याप बांधण्यात आलेली नाही. नाल्यालगत असलेल्या ६०फुटी रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्‍यता आहे. पाच महिन्यांत संपूर्ण संरक्षक भिंत कोसळली आहे. आता तेथे फक्त रचलेले दगड राहिले आहेत. नाल्यामध्ये लहान मुले पडू नयेत यासाठी परिसरातील नागरिक नाल्याच्या बाजूने गाड्या उभ्या करतात, असे येथील रहिवासी अहमद अन्सारी यांनी सांगितले. पालिकेकडून नाल्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. नालेसफाईबरोबरच नाल्यात वाढलेल्या झाडांची छाटणी करून संरक्षक भिंत बांधण्याची मागणी येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. 

Web Title: Ignorance of cleanliness