दुर्लक्षित कलावंतांसाठी लवकरच दत्तक योजना - विनोद तावडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

नवी मुंबई - कलेद्वारे समाजाचे मनोरंजन, प्रबोधन करणारे कलावंत काळाच्या ओघात दुर्लक्षित होतात. या कलावंतांसाठी राज्य सरकार दत्तक योजना सुरू करणार आहे, अशी घोषणा मंगळवारी (ता. 21) सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली. वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्या वेळी तावडे यांनी ही घोषणा केली.

या कार्यक्रमात तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार यंदा राधाबाई खोडे-नाशिककर यांना प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमात तावडेंच्या उपस्थितीत ज्येष्ठ तमाशा कलावंत राधाबाई खोडे-नाशिककर यांना ज्येष्ठ तमाशा कलावंत गंगारामबुवा कवठेकर यांच्या हस्ते तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. पाच लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

राज्य सरकारने केलेला गौरव म्हणजे एवढी वर्षे रंगमंचाची सेवा केल्याबद्दल मिळालेली पोचपावती आहे. याबाबत राज्य सरकारचे आभार व्यक्त करते, अशी प्रतिक्रिया राधाबाई यांनी व्यक्त केली. या वेळी सार्वजनिक बांधकाम तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार नरेंद्र पाटील, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील उपस्थित होते.

राज्य ढोलकी फड तमाशा महोत्सव
पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने 25 मार्चपर्यंत राज्य ढोलकी फड तमाशा महोत्सव होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी साताऱ्याचे तानाजी भोसले वाघिरीकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांनी त्यांची कला सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, तर उद्या (ता. 22) नगरच्या कर्जत येथील मनीषा सिद्धटेककरसह रेश्‍मा नारायणगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ, 23 मार्चला पुण्याच्या जुन्नर येथील दत्ता महाडिक लोकनाट्य तमाशा मंडळ, 24 मार्चला पुण्याच्या नारायणगावकर येथील विठाबाई नारायणगावकर यांचे चिरंजीव कैलाश नारायणगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ कला सादर करणार आहेत, तर 25 मार्चला कोल्हापूरचे रेखा पाटील कोल्हापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळ कला सादर करतील.

Web Title: Ignore artists soon adopted plan