डोंबिवलीतील आरक्षित भूखंड घेणार मोकळा श्वास

डोंबिवलीतील आरक्षित गुरचरण जमिनीवर उभारण्यात आलेली अनधिकृत इमारत
डोंबिवलीतील आरक्षित गुरचरण जमिनीवर उभारण्यात आलेली अनधिकृत इमारत
Updated on

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असताना सरकारी मालकीचे आरक्षित भूखंडही भूमाफियांकडून सुटलेले नाहीत. सरकारी अधिकाऱ्यांचे खिसे गरम करून आरक्षित भूखंडांवर भूमाफियांनी टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. डोंबिवलीमधील कांचनगाव परिसरात गुरचरण असलेल्या आरक्षित भूखंडावरील अशाच टोलेजंग इमारतीचे काम त्वरित थांबवून त्यांना पालिकेच्या सुविधा देऊ नका, अशा आदेशवजा सूचना कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेला दिल्या आहेत. 

डोंबिवलीमधील कांचनगाव येथील गुरचरणासाठी असलेल्या आरक्षित भूखंडावर टोलेजंग इमारती उभारण्यात येत असल्याच्या तक्रारी कल्याण तहसीलदार कार्यालयाकडे आल्या होत्या. याची दखल घेत तहसीलदार दीपक आकडे यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यासमवेत इमारतींची पाहणी केली. त्याच्या अहवालानुसार पहिल्या प्रकरणात गुरचरण सर्व्हे क्र. 17 क्षेत्र 9.68.00 हे. "आर' या जमिनीवर कोणतीही परवानगी न घेता इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सदर इमारतीच्या विकासकाने ही जमीन सरकारकडून नियमानुकूल झाल्याबाबतची कोणतीही परवानगी घेतल्याचे दिसून आले नसल्याचे अहवालात म्हटले आहे. 

त्यामुळे तहसीलदार आकडे यांनी बांधकाम थांबवण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. पालिकेने कुठल्याही प्रकरणात परवानगी न देता नव्याने होणारी बांधकामे त्वरित थांबावीत; तसेच अशा अनधिकृत बांधकामांना कोणत्याही सुविधा देऊ नयेत; तसेच सदर अनधिकृत बांधकामे त्वरित सरकारी धोरणानुसार तोडण्याचे आदेश दिले आहेत.

दुसऱ्या प्रकरणात कांचनगावमधील सर्व्हे क्र. 31 (जुना सर्व्हे क्र. 216) क्षेत्र 2.69 .00 हे. "आर' या जागेतही अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू आहे. संबंधित बांधकामधारकानेही कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या बांधकामावरही कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

पालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाने, सरकारने कारवाईचे निर्देश देऊनही कारवाई होत नाही. पालिका हद्दीत खुलेआम अनधिकृत बांधकामांचे मजले रचले जात आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यास केडीएमसी प्रशासन अपयशी ठरत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. 

गुरचरणासाठी आरक्षित भूखंडावर इमारतीचे अनधिकृत बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम थांबवले असून ती जागा नेमकी पालिकेच्या ताब्यात आहे का, याची माहिती घेतली जात आहे. ही जागा पालिकेच्या ताब्यात नसेल, तर अन्य माध्यम अथवा पालिकेच्या मदतीने हे बांधकाम जमीनदोस्त केलें जाईल. 
- दीपक आकडे, 
तहसीलदार, कल्याण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com