काय आश्‍चर्य..? लक्ष्मीदर्शन झालं अन् यादीत नावेच नाही

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत बांधकामाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, परंतु या यादीत अनेक बेकायदा बांधकामांची नोंद नसल्याने प्रशासनाने ही नावे का वगळली, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

नवी मुंबई : पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत बांधकामाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, परंतु या यादीत अनेक बेकायदा बांधकामांची नोंद नसल्याने प्रशासनाने ही नावे का वगळली, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी पालिकेने ही यादी प्रसिद्ध केली आहे; मात्र ज्या इमारतींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्यातील बहुतांशी इमारतींमध्ये नागरिक राहायला देखील गेले आहेत. त्यामुळे पालिकेला अनधिकृत इमारतींची यादी प्रसिद्ध करून नक्की काय साध्य करायचे आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

ही बातमी वाचली का? नवी मुंबईकरांचा जलप्रवास स्वप्नातचं! 'ही' आहेत कारणे...

नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत सध्यस्थितीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. असे असतानाही यादीत बेलापूर २३, नेरूळ २४, वाशी ४, कोपरखैरणे २७, घणसोली २३, ऐरोली २४, तुर्भे १४; तर दिघा येथे एकही अनधिकृत बांधकाम नसल्याचे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. दिघा परिसरात एकही अनधिकृत बांधकाम नाही, असे स्पष्ट म्हटल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. प्रसिद्ध करण्यात आलेली ही यादी सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीतील इमारतींची आहे, परंतु याच कालावधीत नवी मुंबई परिसरात शेकडो इमारती कोणतीही परवानगी न घेता उभ्या राहिल्या असल्याचे वास्तव आहे. 

ही बातमी वाचली का? महिला चातकासारखी वाट पाहतायेत 'त्यांची'...!

या इमारती निर्माण करणारे भूमाफिया हे प्रशासनाच्या जवळचे असल्याने व भूमाफियांनी लक्ष्मीदर्शनाचे हत्यार उगारल्याने त्यांची नोंदच पालिकेच्या नोंदवहीत नाही, त्यामुळे त्यांना नोटीस देण्यात आली नाही. या कारणांमुळे अनधिकृत यादीत त्यांचा समावेश करण्यात आला नाही, अशी माहिती अतिक्रमण सूत्रांनी दिली आहे. अनधिकृत बांधकामांबाबत अतिक्रमण विभागाने जी प्रसिद्धी केली आहे, त्यामागे मूळ उद्देश हा नागरिकांनी घर घेऊ नये व फसवणूक होऊ नये? हा आहे की काही वेगळा असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

पालिकेकडून जी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याची संबंधित विभागाकडून तपासणी करण्यात येईल. याशिवाय दिघा किंवा अन्य ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांची नावे नसतील तर ती समाविष्ट करण्यात येतील.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal construction in Navi Mumbai There is no record