ठाणे शहरात कोरोना फोफावण्याचा धोका, पाहा ठाण्यात काय सुरु आहे

दीपक शेलार
Monday, 14 September 2020

अनलॉकनंतर अनेकांनी आपले पूर्वीचे व्यवसाय सुरू केले आहेत. तर काहींनी रोजगार नसल्याने शहरातील रस्ते आणि पदपथावर लहान- मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. 

ठाणे : अनलॉकची प्रक्रिया सुरू होताच  मुळगावी गेलेले लाखो परप्रांतीय श्रमिक, व्यावसायिक ठाणे शहरात परतले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी शहरात ठिकठिकाणी पुल, पदपथांवर पथारी पसरून भाजी विक्री, फळविक्रीपासून अन्य लहान- मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे आरोग्य नियमांचा फज्जा उडाला असून कोरोन संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत नुकत्याच केलेल्या अँटीजेन तपासणीत अनेकांना लागण झाल्याचे दिसून आले होते.

कोरोनाची धास्ती आणि लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्तितीनंतर अनेक कष्टकरी, मिळेल त्या वाहनाने मुंबई-ठाण्यातून लाखोंच्या संख्येने त्यांच्या मुळगावी गेले होते. त्यामध्ये परप्रांतियांची संख्या मोठी होती. मात्र, गावीही उपासमार होऊ लागल्याने ते पुन्हा  ठाणे शहरात परतले आहेत.

महत्त्वाची बातमी - मुंबईत कोरोना रूग्णवाढ सुरूच; परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जातेय का ?

अनलॉकनंतर अनेकांनी आपले पूर्वीचे व्यवसाय सुरू केले आहेत. तर काहींनी रोजगार नसल्याने शहरातील रस्ते आणि पदपथावर लहान- मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. 

कांदापोहे, फिरते चहावाले...

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सकाळच्या सुमारास अनेक खादयपदार्थाचे स्टॉल दिसू लागले आहेत. पादचारी पुलांवरदेखील मोबाईल संबंधित वस्तूंची विक्री करणारे अनेक विक्रेते दिसतात. काहींनी तर हातगाड्यांवर भाजीपाला विक्री, सुरू केली आहे. पाणीपुरी, कांदेपोहे, आईस्क्रीम-फालुदा आदींची विक्री सुरू आहे.  काही फिरस्ते चहा व अन्य खाद्यपदार्थ शहरभर फिरून विकत असल्याने जागोजागी आरोग्य नियमावलीचा फज्जा उडताना दिसत आहे.

याबाबत ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख म्हणतात, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची ठाणे महापालिकेच्यावतीने तात्काळ अँटीजेन तपासणी सुरू आहे. या तपासणीत बाधीत आढळणाऱ्या प्रवाशांवर उपचार केले जात आहेत. दुसरीकडे रस्ते व पदपथ अडवून आरोग्याची हेळसांड कुणी करीत असेल तर, प्रशासनातर्फे कारवाई केली जाईल.

महत्त्वाची बातमी - ऑक्सफर्डच्या लसीची मुंबईत चाचणी होणार की नाही? महत्त्वाची बातमी अखेर आलीच

तर, ठाण्यातील गृहिणी उज्वला गवस म्हणतात की, लॉकडाऊन काळात शहरातील रस्ते आणि पदपथ फेरीवालामुक्त झाले होते. मात्र, अनलॉकची प्रक्रीया सुरू होताच परप्रांतिय शहरात परतू लागल्याने शहराची रयाच निघून गेली आहे. पुन्हा तिच बजबजपुरी होऊ लागल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने यावर कठोर उपाययोजना करण्यासह कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे.

illegal hawkers started their small businesses in thane corona might spread in the city


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal hawkers started their small businesses in thane corona might spread in the city