बेकायदा फेरीवाल्यांचा बाजार उठणार!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

  • पालिका आकारणार पाच हजार रुपये दंड 
  • निर्णयाची लवकरच अंमलबजावणी

मुंबई : पालिकेच्या फेरीवाला धोरणाचा कोणताही परिणाम बेकायदा फेरीवाल्यांवर झालेला दिसत नाही. धोरणांच्या अंमलबजावणीअभावी शहरातील रस्ते, पदपथ बेकायदा फेरीवाल्यांनी काबीज केले आहेत. त्यामुळे या फेरीवाल्यांना चाप लावण्यासाठी त्यांच्याकडून पाच हजारांपर्यंत दंड आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. 

असा करा हुकूमशाहीचा सामना, वाचा काय म्हणाले पवार?

मुंबईतील रस्ते, पदपथ, नाक्‍या-नाक्‍यावर बेकायदा फेरीवाले उभे राहतात. मुंबईकरांना यातून मार्ग काढताना मोठे दिव्य करावे लागते. या फेरीवाल्यांवर पालिकेकडून अनेकदा दिखाऊ कारवाई केली जाते; मात्र याचा काहीही परिणाम या फेरीवाल्यांवर झालेला नाही. याविरोधात लोकप्रतिनिधींसह, सामाजिक कार्यकार्ये आणि सर्वसामान्य नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनदेखील त्याची फारशी गंभीर दखल प्रशासनाने घेतली नव्हती. आता मात्र पालिका प्रशासनाने बेकायदा फेरीवाल्यांच्या मुसक्‍या आवळण्याचा निर्णय घेतला आहे. 

शहरातील जागोजागी पसारा मांडणाऱ्या या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी पालिकेने याआधीही धोरण तयार केले, परंतु हे धोरण कागदावरच राहिले. या धोरणाची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. त्यामुळे फेरीवाल्यांचे फावले असून पश्‍चिम उपनगरातील अंधेरी, विलेपार्ले येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांनी जागा व्यापल्या आहेत. संध्याकाळच्या सुमारास हे प्रमाण अधिक असते. यामुळे वाहतुकीचा खोळंबादेखील होतो. 

धुर दिसताच तिने लोकलमधून उडी मारली अन्...

आता तरी चाप बसणार का? 
पालिकेने शहरातील बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी खासगी कंपनी नेमून दोन पाळ्यांत कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी विधी समितीच्या सभेत हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली. तसेच बेकायदा पार्किंगच्या पाच ते 10 हजारच्या दंडात्मक रकमेप्रमाणे 1200 ते दीड हजार रुपये दंड आकारावा अशी सूचना केली. प्रशासनाने याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बेकायदा फेरीवाल्यांवर मोठा दंड आकारून त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे मोकळ्या जागांवर बस्तान बसवणाऱ्या फेरीवाल्यांना चाप लागेल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal hawkers will have to pay a hefty penalty