बेकायदा पार्किंग पालिकेच्या रडारवर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

नवी मुंबई - शहरातील रस्ते व फूटपाथवर बिनधास्तपणे वाहने उभी करणाऱ्यांविरोधात आता महापालिकेने जोरदार कारवाई सुरू केली आहे. रस्त्यालगत व फूटपाथवर वाहने उभी करणारे व विनापरवानगी गॅरेज चालवणाऱ्या 900 जणांना महापालिकेने नोटीस बजावली असून, वाहने न हटवल्यास दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे. 

नवी मुंबई - शहरातील रस्ते व फूटपाथवर बिनधास्तपणे वाहने उभी करणाऱ्यांविरोधात आता महापालिकेने जोरदार कारवाई सुरू केली आहे. रस्त्यालगत व फूटपाथवर वाहने उभी करणारे व विनापरवानगी गॅरेज चालवणाऱ्या 900 जणांना महापालिकेने नोटीस बजावली असून, वाहने न हटवल्यास दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे. 

नवी मुंबई शहरात रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करून वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्यांविरोधात महापालिकेकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. अशा तक्रारी लक्षात घेत आता महापालिकेने रस्त्यालगत व फूटपाथवर वाहने उभी करणे, गॅरेज उघडून वाहने दुरुस्त करून पादचाऱ्यांना अडथळा आणणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. ऐरोली ते थेट बेलापूरपर्यंतच्या परिसरातील शहरातील मुख्य रस्त्यांच्या शेजारी फूटपाथवर किंवा सर्व्हिस रोडवर बिनधास्तपणे वाहने उभी करण्याचा प्रकार सुरू आहे; तर वाशी सेक्‍टर 17 व पामबीच मार्गावर सतारा प्लाझापासून थेट कोपरी गाव व बोनकोडे गावाच्या भागात रस्त्याच्या कडेला व फूटपाथवर राजरोसपणे गॅरेज उघडून हजारो रुपये कमावले जात आहेत. या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्यांची दुरुस्ती व नवीन खरेदीनंतर सजावट केली जाते. त्यामुळे एका गाडीमागे एक अशा रांगा लावून पामबीचवर संध्याकाळी वाहतुकीचा खोळंबा होतो. अशा परिस्थितीत तातडीच्या कामासाठी एखादी रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचे बंब आल्यास त्यांनाही वाट मिळणे अवघड होऊन जाते. त्यामुळे फूटपाथवर गॅरेज उघडून वाहने उभी करून अडथळा आणणाऱ्यांना नोटिसा बजावल्यानंतरही गॅरेज बंद न केल्यास फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. 

बेलापूर, वाशी, सानपाडा, नेरूळ, कोपरखैरणे, ऐरोली व घणसोली परिसरातील अंतर्गत मोकळ्या रस्त्यांवर स्कूल बस व ट्रक पार्क केले जातात. काही ठिकाणी तर वर्षानुवर्षे अशी बेवारस अवस्थेत अनेक वाहने पडली आहेत, अशा वाहनांची उपप्रादेशिक कार्यालयाकडून माहिती घेऊन त्यांच्या मालकांकडून दंड वसूल केला जाणार आहे. 

कुठे आहे अतिक्रमण? 
नेरूळ येथील डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलासमोर बॅंक ऑफ बडोदाच्या शेजारी, वाशी सेक्‍टर 17 येथील जे. के. चेंबर्स, वर्धमान मार्केट, एमएससी बॅंक, मानसरोवर या ठिकाणी गॅरेजवाल्यांनी फूटपाथ गिळंकृत केला आहे; तर वाशी अरेंजा कॉर्नर येथील फूटपाथ सर्रासपणे टायरवाल्यांनी हडप केला आहे. याव्यतिरीक्त पामबीच मार्गावरचा सतारा प्लाझाच्या शेजारी रस्त्यावर गॅरेजवाले ते कोपरी गावापर्यंत रस्त्यालगत असणारे फूटपाथ विविध चारचाकींची विक्री करणाऱ्यांनी संसार थाटले आहेत. 

Web Title: illegal parking