पालीत बेकायदा पार्किंगची समस्‍या बिकट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

अष्टविनायकांपैकी एक बल्लाळेश्‍वराचे स्थान पालीत असल्याने येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते. त्यामुळे शहरात अवैध पार्किंगची समस्या अधिक बिकट बनली आहे.

पाली (वार्ताहर) : अष्टविनायकांपैकी एक बल्लाळेश्‍वराचे स्थान पालीत असल्याने येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते. त्यामुळे शहरात अवैध पार्किंगची समस्या अधिक बिकट बनली आहे. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होऊन वाहनचालक, पादचारी व भाविकांची गैरसोय होत आहे. ‘सकाळ’ने वारंवार बातम्यांच्या माध्यमातून या समस्येकडे लक्ष वेधले आहे. 

येथील बाजारपेठ रस्ता, गांधी चौक रस्ता,  दुय्यम निबंधक कार्यालय, जुने एस. टी. स्टॅंड, बल्लाळेश्‍वर मंदिराचा परिसर, मिनिडोर स्टॅंड ते बस स्टॅंड रस्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुचाकी अवैधरित्या पार्क केलेली असतात. ‘नो पार्किंग’चे फलक काही ठिकाणी बसविण्यात आले असले तरी त्याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे. परिणामी येथून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना व पादचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना रस्त्यावरून मार्ग काढताना अडचणी येतात. 

अष्टविनायकाचे स्थान असलेल्या पालीत बल्लाळेश्‍वराचे दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक येतात. सध्या दिवाळी सुट्यांमुळे येणाऱ्या भाविकांची अवैध पार्किंगमुळे गैरसोय होत आहे.  

काही वेळेस वाहतूक पोलिस येथील नाक्‍यावर व गर्दीच्या ठिकाणी तैनात असतात. तसेच बल्लाळेश्‍वर देवस्थानचे सुरक्षा रक्षकदेखील मंदिराजवळ वाहतूक कोंडी सोडविण्याचा व अवैध पार्किंग रोखण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. पालीत मोकळ्या जागांवर सशुल्क वाहनतळ उभे केल्यास बेकायदा पार्किंगचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात मार्गी लागू शकतो, असे मंगेश यादव यांनी सांगितले.

वाहनतळाची कमतरता
पाली शहरात नागरीकरण वेगाने सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या इमारती व व्यापारी संकुल उभे राहात आहेत. त्यात रस्त्याच्या बाजूला जुनी घरे, दुकाने तोडून तिथे नवीन इमारती व व्यापारी गाळे बनत आहेत. तसेच विकासकांनी इमारतीला वाहनतळाची सोय केली नाही. तर काही ठिकाणी पार्किंगची सोय केली असली तरी ती अपुरी ठरत आहे. यामुळे ठिकठिकाणी अवैध पार्किंगचा विळखा वाढत आहे.

ठिकठिकाणी बेकायदा वाहने पार्क होत असल्यामुळे पादचारी व वाहनचालकांची गैरसोय होते. अवैधरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे.
- प्रशांत खैरे, व्यापारी, पाली

 पालीत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी बरेचसे रस्ते वन-वे करण्यात आले आहेत. स्थानिक लोकांकडून थोडी अपेक्षा आहे की त्यांनी नियमांचे पालन करावे. आमचे पोलिसदेखील अवैध पार्किंग रोखण्यासाठी व वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बाहेरून येणाऱ्या भाविकांना व लोकांना या संदर्भात आमचे पोलिस मार्गदर्शन करतात.
- बाळा कुंभार, पोलिस निरीक्षक, पाली-सुधागड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal parking in Pali