बेकायदा पार्किंगने मार्ग रोखले

बेकायदा पार्किंगने मार्ग रोखले

ऐरोली - वाशी ते ऐरोलीदरम्यानचे रहिवासी वाहतूक कोंडीमुळे मेटाकुटीला आले असतानाच उर्वरित उपनगरेही त्यातून सुटली नाहीत. नेरूळमध्ये शाळा-महाविद्यालये अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांच्या बस-रिक्षांमुळे ही समस्या बिकट आहे.

सीवूड्‌स स्टेशनजवळ हावरे मॉलसमोर रस्त्यात वाहने उभी केल्याने गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होते. डॉन बास्को हायस्कूल, ग्रॅंड सेंट्रल मॉल, सीवूडस स्थानक पूर्व भाग येथे रस्त्यातील बेकायदा पार्किंगमुळे नियमित वाहतूक खोळंबा होत असतो. तर बेलापूरमध्ये हॉटेल, बार यांच्यासमोरील बेकायदा पार्किंग वाहतूक समस्येला प्रमुख कारण ठरत आहे. पालिका मुख्यालयासमोर नव्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.  शीव-पनवेल मार्ग आणि  जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या या रस्त्यावर अवजड वाहनांची ये जा सुरू असते. विशेष म्हणजे या चारही उपनगरांत बेकायदा पार्किंग ही मोठी समस्या आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही हा प्रश्‍न सुटला नाही.

तुर्भ्यात गॅरेजमुळे प्रवाशांना दगदग
तुर्भे एपीएमसी मार्केट येथे किरकोळ खरेदीला येणारे ग्राहक वर्धमान मार्केट परिसरात गाड्या रस्त्यात आणि नो पार्किंगच्या ठिकाणी उभ्या करतात. त्यामुळे येथे खोळंबा होत असतो. मार्केटमध्ये येणाऱ्या अवजड वाहनांचाही परिणाम वाहतुकीवर होतो. येथेच  पेट्रोल पंपाच्या मागे गॅरेज असल्याने दुरुस्तीसाठी गाड्या रस्त्यात उभ्या असतात. त्यामुळेही परिसराला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागलेले आहे. वाशीकडे जाणाऱ्या वाहनांमुळेही कोेंडी होते.

सानपाड्यात शाळांसमोर कोंडी
सानपाडा सेक्‍टर- १० येथील रेयॉन इंटरनॅशनल स्कूलसमोर शाळेच्या बस रस्त्यात उभ्या असतात. सेक्‍टर- ८ येथील सेवेन्थ डे ॲडव्हेंटिस स्कूल या दोन्ही ठिकाणी शाळा सुटताना आणि भरताना रस्त्यात वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडी होते. बेकायदा पार्किंगचा शाप या भागालाही आहे. त्याकडे वाहतूक पोलिस लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. बेशिस्त वाहन चालकांमुळेही या परिसरातील वाहतूक समस्या गंभीर आहे. 

नेरूळमध्ये  नागरिकांच्या नाकीनऊ
नेरूळ सेक्‍टर- १ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एलपी नाका या रस्त्यात ‘नो पार्किंग’मध्ये वाहने उभी केलेली असतात. याच रस्त्यावर पेट्रोल पंप व डी. वाय. पाटील विद्यापीठ आहे. वाहने आणि पादचाऱ्यांची वर्दळ असलेल्या या ठिकाणी गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होते. डी. वाय. पाटील स्कूलसमोर वाहतूक कोंडी होते. नेरूळ स्थानक पूर्व येथील अभ्युदय बॅंक ते शिरवणे गाव या अरुंद रस्त्याच्या बाजूने वाहने उभी असतात. 

कार्यालयांमुळे     प्रश्‍न बिकट
बेलापूर विभागात शीव-पनवेल मार्गाजवळ  सिडको भवन आणि कोकण भवन ही दोन महत्त्वाची कार्यालये व त्याचे पुढे नवी मुंबई पोलिस आयुक्तालय, पालिका कार्यालय आहे. येथे कामानिमित्त नागरिकांची वर्दळ सुरू असते. येथे रस्त्यात वाहने उभी केल्याने वाहने चालवणेही कठीण होते.   या उपनगरात हॉटेलची संख्या अधिक आहे. त्यांच्या ग्राहकांची वाहने भर रस्त्यात उभी असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com